रोहे : प्रतिनिधी
कोकण एज्युकेशन सोसायटीच्या रोहे येथील डॉ. चिंतामणराव देशमुख वाणिज्य व सौ. कुसुमताई ताम्हाणे कला महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग व उपजिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थीनींसाठी महाविद्यालयाच्या सभागृहात आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्राचार्य डॉ. अतुल साळुंके यांच्या हस्ते या आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजनेचे रायगड जिल्हा समन्वयक प्रा. तुळशिदास मोकल यांनी प्रास्ताविकात शिबिराचा उद्देश स्पष्ट केला. प्राचार्य डॉ. अतुल साळुंके यांनीही मनोगत व्यक्त केले. या शिबिरात 98 विद्यार्थिनींची हिमोग्लोबिन, रक्तगट व थायरॉईडबाबतची तपासणी करण्यात आली. रोहा उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी सलमा मुकादम, डॉ. साराह डोंगरकर, सिस्टर इंचार्ज सुजाता बुधे यांनी शिबिरार्थींना आरोग्यविषयक मार्गदर्शन करून विद्यार्थिनींच्या शंकांचे निरसन केले. समुपदेशक महेश गोसावी, लॅब टेक्निशियन आशा पाखर यांनी आरोग्य तपासणी कार्यात महत्वाची भूमिका बजावली. कार्यक्रम अधिकारी प्रा. सिमा भोसले, प्रा. अनंत थोरात, प्रा. सुकुमार पाटील, प्रा. शत्रुघ्न लोहकरे, डॉ. अनिल शिंदे, डॉ. कमलाकर कांबळे, डॉ. सम्राट जाधव, प्रा. शिल्पा खाडे, प्रा. वैशाली कनावडे आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.