Breaking News

द्रोणागिरी पोलीस ठाण्याची दुर्दशा

सिडको व राज्य शासनाने लक्ष देण्याची मागणी

उरण : प्रतिनिधी

उरण-पनवेल रोडवरील फुंडे कॉलेज समोरील द्रोणागिरी नोडच्या सुरक्षेसाठी सुमारे 24 वर्षांपूर्वी सिडकोने बांधलेल्या पोलीस ठाण्याची इमारत पूर्णतः खंडर झाली आहे. गुन्हेगारीला पायबंद घालण्यास सज्ज होण्याआधीच या पोलीस ठाण्याला भूतबंगल्याची अवकळा आल्याने जनतेत संताप व्यक्त होत आहे. सिडको व राज्य शासनाने ही इमारत नव्याने बांधावी, अशी मागणी जनतेतून होत आहे.

सिडकोच्या माध्यमातून उरण तालुक्यात द्रोणागिरी नोडची निर्मिती केली. औद्योगिक विभाग व नागरी वस्तीचा विस्तार करण्यासाठी द्रोणागिरी नोडची रचना करण्यात आली. या विभागात भविष्यात होणार्‍या विकासाबरोबरच गुन्हेगारी वाढण्याच्या शक्यतेने सिडकोने फुंडे हायस्कूलच्या रस्त्यापलिकडे प्रशस्त अशी द्रोणागिरी पोलीस ठाण्याची इमारत उभी केली. सुमारे 24 वर्षांपूर्वी बांधलेल्या या इमारतीवर त्यावेळी सुमारे 35 लाखांचा निधी खर्च करण्यात आला होता, मात्र काही तांत्रिक कारणांमुळे ही पोलीस ठाण्याची इमारत नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडे हस्तांतरित झाली नाही. पर्यायाने या इमारतीत पोलीस खात्याचा खाकी रुबाब कधीच अवतरला नाही. जर द्रोणागिरी पोलीस ठाणे अस्तित्वात आले असते तर ते उरण तालुक्यातील जनतेला सोयीचे झाले असते, मात्र पोलीस खात्याची सलामीच या प्रशस्त इमारतीला मिळाली नसल्याने आज ही इमारत भूतबंगला वाटत आहे.

सध्या सिडकोने या इमारतीच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक ठेवले असले तरी यापूर्वी ही इमारत आंबट शौकिनांचा अड्डा म्हणून ओळखली जात होती. परिणामतः सिडकोने या पोलीस ठाण्याच्या इमारतीचे नव्याने बांधकाम करून द्रोणागिरी पोलीस ठाणे म्हणून नावारूपाला आणण्याची मागणी जनतेतून होत आहे.

सिडकोच्या जागेमध्ये द्रोणागिरी पोलीस ठाणे साधारणतः 1997च्या आसपास बांधण्यात आले होते, परंतु त्याचा काही वापर झाला नाही. मात्र आत्ता तोच भूखंड नवी मुंबई आयुक्तलयाकडे वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

-भगवान साबळे, कार्यकारी अभियंता, सिडको

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply