Breaking News

रायगडात सोमवारपासून उघडणार 545 शाळांची कवाडे  

पालकांची मात्र ‘नकारघंटा’

अलिबाग : प्रतिनिधी
राज्य शासनाच्या निर्देशानुसार रायगड जिल्ह्यातदेखील पनवेल महापालिका क्षेत्र वगळता इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग येत्या सोमवार (दि. 23)पासून सुरू होणार आहेत. शिक्षण विभागामार्फत शिक्षकांची कोविड आरसीपीटीआर चाचणी, शाळांचे सॅनिटायझेशन सुरू आहे. पाल्याला शाळेत पाठविण्यासाठी पालकांनी हमीपत्र द्यावे असा तगादा आता शाळांमधून लावला जात असून, त्याकरिता सर्वच शाळांमधून पालक सभांनांदेखील सुरुवात करण्यात आली आहे, मात्र पुन्हा कोरोना रुग्ण वाढत असल्याने पाल्यांना सध्या शाळेत पाठवण्यासाठी पालक अनुत्सुक असल्याचे चित्र आहे.
कोरोना काळात मार्चपासून बंद असलेल्या जिल्ह्यातील सुमारे 545 शाळा पुन्हा सुरू होणार आहेत. त्यासाठी शासनाने आखून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार तयारी करण्यात येत आहे. पालक व शाळांसाठी मार्गदर्शक सूचना सक्तीच्या करण्यात आल्या आहेत. पालकांच्या संमतीशिवाय मुलांना शाळेत प्रवेश देऊ नये असे आशयाचे परिपत्रक शालेय शिक्षण विभागाने याधीच जारी केले आहे. त्यानुसार मुख्याध्यापकांनी पालकांना हमीपत्राविषयी माहिती दिली आहे, मात्र अनेक पालकांकडून मुख्याध्यापकांना हमीपत्र अद्याप मिळालेले नाही. हमीपत्रासाठी पालकांना संपर्क केला असता, पालकांकडून नकारघंटा ऐकावयास येत आहे.
हमीपत्राशिवाय शाळेत प्रवेश देणार नसल्याने पालकांची इकडे आड तिकडे विहीर अशी स्थिती झाली आहे. शाळा सुरू झाल्यावर केवळ 25 टक्केच विद्यार्थी हजेरी लावतील, असा अंदाज काही  शाळांनी व्यक्त केला आहे.
जिल्ह्यात नववी ते बारावीच्या वर्गांना शिकवणारे तब्बल आठ हजार 935 शिक्षक आहेत. त्यातील केवळ अडीच हजार शिक्षकांची कोविड चाचणी झाली असून, एक हजार शिक्षकांचा अहवाल प्राप्त झाला आहे. पनवेलमधील सहा शिक्षकांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील शाळा सुरू होणार असल्या तरी पनवेल महापालिका क्षेत्रातील शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंदच राहणार आहेत. पनवेलमध्ये नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग असलेल्या 101 शाळा आहेत. या शाळांसह महापालिका हद्दीलगतच्या काही शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही.

रायगड जिल्ह्यात पनवेल महापालिका वगळता अन्य भागातील नववी ते बारावीचे वर्ग दररोज चार तासांसाठी सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी स्वच्छता व आरोग्य सुरक्षेच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असणार आहे. ज्या शिक्षकांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटीव्ह असेल त्यांनाच शाळेत प्रवेश मिळेल.
-भाऊसाहेब थोरात, शिक्षणाधिकारी (रायगड जिल्हा परिषद)

संभ्रम आणि सावळागोंधळ!
पाली : शाळा सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व मुख्याध्यापकांना कोविड आरसीपीटीआर करणे बंधनकारक केले आहे, मात्र चाचणी केंद्रावर होत असलेली गर्दी, नियोजनाचा अभाव, काही ठिकाणी फक्त अनुदानित शाळांतील शिक्षकांनाच मोफत चाचणी करून देण्याचे आदेश व तालुक्याव्यतिरिक्त इतर तालुक्यातील शिक्षकांची चाचणी न करणे अशा अनेक गोष्टींमुळे संभ्रम व सावळागोंधळ निर्माण झाला आहे.
कर्जत येथे गुरुवारी चाचणी केंद्रावर प्रचंड गर्दी व गोंधळ उडाला होता. याच दिवशी पनवेल येथे चाचणी करून परतणार्‍या दोन शिक्षकांचा अपघाती मृत्यू झाला.
काही ठिकाणी दुसर्‍या तालुक्यात राहणार्‍या शिक्षकांना त्यांची शाळा असलेल्या तालुक्यात चाचणी करण्यास सांगितले आहे. त्यामुळे या शिक्षकांची गैरसोय झाली आहे.
पनवेलमध्ये प्रशासनाने तर फक्त अनुदानित शाळांची मोफत कोविड आरसीपीटीआर चाचणी उपजिल्हा व महापालिका रुग्णालयात होईल, असे सांगितले आहे. विना अनुदानित, अंशतः अनुदानित व स्वयंम अर्थसहाय्य शाळांनी त्यांच्या शिक्षकांच्या चाचण्या स्वतः करून घेण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे या शिक्षकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
पहिली ते आठवीच्या शिक्षकांनादेखील ही चाचणी 22 तारखेपर्यंत करणे सक्तीचे केल्याने चाचणी केंद्रावर आणखी गर्दी होत आहे. हे शिक्षक सध्या ऑनलाइन शिकवत आहेत. त्यामुळे या शिक्षकांची चाचणी नंतर केली असती, तर गोंधळ टाळता आला असता, मात्र याबाबत स्थानिक प्रशासन मुख्य अप्पर सचिव यांच्या पत्रानुसार कार्यवाही केली जात असल्याचे सांगते.
राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनी सांगितले की शाळा सुरू करणे व विद्यार्थी शाळेत पाठविणे बंधनकारक नाही, मात्र शिक्षकांनी शाळेत जाणे आवश्यक आहे. याबरोबरच जे विद्यार्थी शाळेत येणार नाहीत त्यांना ऑनलाइन शिक्षण द्यावे. यामुळे पुन्हा संभ्रम निर्माण झाला आहे.

मुळात सरसकट सर्व शिक्षकांची चाचणी मोफत करणे आवश्यक आहे तसेच शिक्षक संख्या जास्त असलेल्या शाळेतच चाचणी घेण्याची व्यवस्था केली पाहिजे होती. याबरोबरच चाचणी केंद्रावर सोशल डिस्टन्सिंग पाळणे व नियोजन करणेदेखील आवश्यक आहे.
-दीपक घोसाळकर, शिक्षकेत्तर कर्मचारी

Check Also

सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …

Leave a Reply