Breaking News

रायगडभूषण पुरस्काराचा बाजार

रायगड जिल्हा परिषदेतर्फे नुकतेच रायगडभूषण पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. वितरण म्हणण्यापेक्षा त्याला खिरापत वाटप असेच म्हटले पाहिजे. तब्बल 187 जणांना हा पुरस्कार देण्यात आला. यापैकी  श्रीवर्धन, पेण आणि अलिबाग मतदारसंघांतील 120 जणांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. याचा अर्थच असा होतो की विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन राजकीय हेतूनेच हे पुरस्कार देण्यात आले आहेत. अवघ्या सहा महिन्यांत दोन वेळा रायगडभूषण पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. लोकसभा निवडणूकीपूर्वी 153 जणांना हा पुरस्कार देण्यात आला होता. म्हणजे सहा महिन्यांत 340 जणांना रायगडभूषण पुरस्काराचे वितरण करण्याचा विक्रम रायगड जिल्हा परिषदेने केला आहे. या प्रतिष्ठेच्या पुरस्काराचा बाजार रायगड जिल्हा परिषदेतील सत्ताधार्‍यांनी मांडला आहे. कुणालाही हा पुरस्कार दिला जातोय. त्यामुळे या पुरस्काराचे अवमूल्यन झाले आहे.

रायगड जिल्ह्यातील ज्या व्यक्ती आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करतात त्यांना सन्मानित करण्याच्या हेतूने रायगडभूषण पुरस्कार देण्यात येतो. मागील काही वर्षांपासून या पुरस्कार विजेत्यांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे त्यावर टीका होत आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आदिती तटकरे व उपाध्यक्ष अ‍ॅड. आस्वाद पाटील तरुण आहेत. हे दोघे परंपरा मोडित काढून त्यात सुसूत्रता आणतील असे वाटत होते, परंतु झाले भलतेच. याच दोघांच्या कारकिर्दीत सर्वाधिक पुरस्कारांचे वाटप करण्यात आले. पुरस्कार विजेत्यांची नावे जाहीर केली जात नाहीत. आदल्या दिवशी फोन करून पुरस्कार विजेत्यांना कळविण्यात आले. त्यापुढचा कळस म्हणजे आपल्या ओळखीच्या लोकांचे सन्मानचिन्ह घेऊन ऐनवेळी काही लोकांना पुरस्कार देण्यात आले. याच्यासारखी वाईट गोष्ट नाही. बरं ज्यांची निवड करण्यात आली त्यातील नावे वाचली तर त्यांनी रायगडसाठी काय केले, असा प्रश्न पडतो. काही लोकांनी पक्षांतर करून ग्रामपंचायत निवडणुकीत मदत केली म्हणून, तर काहींनी ग्रामपंचायत निवडणुकीत थेट सरपंचपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली म्हणून त्यांना रायगडभूषण देऊन सन्मानित करण्यात आले ही वस्तुस्थिती आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी जिल्ह्यातील 153 जणांना रायगडभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते. आता विधानसभा निवडणुकीपूर्वी 187 जणांना रायगडभूषण वितरित करण्यात आले. निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून या पुरस्कारांची जणू खिरापत वाटण्यात आली. रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आदिती तटकरे या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन श्रीवर्धन मतदारसंघातील पाच तालुक्यांत 46 रायगडभूषण वितरित केले आहेत. यात माणगाव तालुक्यातील 19, रोहा तालुक्यातील 16, म्हसळा तालुक्यातील 4, श्रीवर्धन तालुक्यातील 3 आणि तळा तालुक्यातील 2 जणांचा समावेश आहे. शेकापचे बालेकिल्ले असणार्‍या अलिबाग आणि पेण विधानसभा मतदारसंघात पुरस्कारांचा वर्षाव करण्यात आला आहे. पेण विधानसभा मतदारसंघातील 44 जणांना, तर अलिबाग विधानसभा मतदारसंघातील 30 जणांना रायगडभूषण पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे. पेण तालुक्यातील 39 जणांना, तर अलिबाग तालुक्यातील 26 जणांना रायगडभूषण देण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असणार्‍या कर्जत, खालापूर मतदारसंघातील 21 जणांना रायगडभूषण पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे. शिवसेना आणि भाजपचे वर्चस्व असणार्‍या पनवेल आणि उरण तालुक्यात पुरस्कार वितरण करताना आखडता हात घेतला आहे. उरणमधील 11 जणांना, तर पनवेल तालुक्यातील आठ जणांनाच या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे. महाड, पोलादपूरमधील 22 जणांना पुरस्कार मिळाला आहे.

विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणार्‍या व्यक्तींचा सन्मान व्हावा, त्यांचे कार्य जनमानसापर्यंत पोहचावे, यातून इतरांनाही चांगले काम करण्याची प्रेरणा मिळावी, हा रायगडभूषण पुरस्कार देण्यामागचा उद्देश होता. सत्ताधार्‍यांना वाटते त्यांना पुरस्कार दिला जातो.  गेल्या काही वर्षांत पुरस्कारार्थींची यादी लांबत चालली आहे. रायगडभूषण पुरस्कार वितरण समारंभात पुरस्कार विजेत्यांची नावे पुकारली जाताना लोकांत काय प्रतिक्रिया होत्या याची सत्ताधार्‍यांनी माहिती घ्यावी. रायगडभूषण पुरस्कार चेष्टेचा विषय बनला आहे. पुरस्काराचे अवमूल्यन झाले आहे. पुरस्काराची प्रतिष्ठाच राहिली नाही. सध्या जी टीका संपूर्ण जिल्ह्यात होत आहे त्याचा रायगड जिल्हा परिषदेने गांभीर्याने विचार करायला हवा.

वास्तविक पुरस्कारांसाठी निवड करण्याकरिता तज्ज्ञांची एक समिती नेमायला हवी. पुरस्कारासाठी निवड करताना त्या व्यक्तींकडून प्रस्ताव मागवून त्याची छाननी करून पुरस्कारासाठी निवड करायला हवी. प्रत्येक क्षेत्रासाठी एका व्यक्तीची निवड करून त्यांना हा पुरस्कार द्यायला हवा. एका ठरावीक दिवशीच या पुरस्कारांचे वितरण व्हायला हवे. पुरस्कार निवडीत पारदर्शकता आणावी. जर हे शक्य होणार नसेल, तर रायगडभूषण पुरस्काराचा बाजार बंद करावा.

-प्रकाश सोनवडेकर, खबरबात

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास …

Leave a Reply