उरण : वार्ताहर
उरण तालुक्यातील नागाव, केगाव, म्हातवली, चाणजे, फुंडे व वेश्वी या सहा ग्रामपंचायतींमध्ये शुक्रवारी (दि. 15) सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत निवडणूक होणार असून तालुक्यातील मतदान केंद्रावरील शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.
उरण नगरपरिषदचे महाराष्ट्रभूषण डॉ. नारायण विष्णू धर्माधिकारी शाळेत गुरुवारी (दि. 14) सकाळी मतदान साहित्य वाटप करण्यात आले. कर्मचार्यांना केंद्रावर रवानगी करण्यात आली.
उरण तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींमध्ये एकूण 31,0304 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील त्यात पुरुष -15,615 व स्त्रिया 15,688 असतील. निवडणूक प्रक्रियेमध्ये एकूण मतदान केंद्र 43 असून एका मतदान केंद्रात एक केंद्राध्यक्ष, तीन अधिकारी व एक शिपाई असे आहेत.
निवडणूक प्रक्रियेत सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) (पोर्ट विभाग) सचिन सावंत व उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यात पाच पोलीस निरीक्षक, 20 अधिकारी व 124 कर्मचार्यांचा समावेश आहे.
मतमोजणी सोमवारी (दि. 18) सकाळी 8 वाजल्यापासून उरण नगरपरिषदेचे महाराष्ट्रभूषण डॉ. नारायण विष्णू धर्माधिकारी शाळेत होईल. ही मतमोजणी उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली होईल, अशी माहिती महसूल सहाय्यक शिवनाथ गिरी यांनी दिली.