Breaking News

पहिल्या दिवशी 268 जणांचे लसीकरण

अलिबाग ः प्रतिनिधी

केंद्र आणि राज्य शासनाच्या सूचनेप्रमाणे शनिवारी (दि. 16) जिल्ह्यातील शासकीय जिल्हा रुग्णालय, अलिबाग येथे कोविशिल्ड लसीकरण मोहिमेचा शुभारंभ पालकमंत्री तसेच अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या वेळी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्यासह लोकप्रतिनिधी तसेच संबंधित यंत्रणांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांना लस टोचून कोविशिल्ड लसीकरण मोहिमेस सुरुवात करण्यात आली. त्यानंतर दिवसभरात जिल्हा सामान्य रुग्णालयात 27, उपजिल्हा रुग्णालय येथे 41, एमजीएम कामोठे येथे 100 आणि येरळा मेडिकल कॉलेज येथे 100 अशा एकूण 268 जणांना लस टोचण्यात आली, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी दिली. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात अलिबाग, पेण येथे प्रत्येकी एक आणि पनवेल येथील दोन अशा चार केंद्रांच्या माध्यमातून आरोग्य कर्मचार्‍यांना कोविशिल्ड लस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील कोविशिल्ड लसीकरण मोहिमेसाठी नऊ हजार 500 लशी प्राप्त झाल्या आहेत.

 पहिला डोस घेतल्यानंतर 28 दिवसांनंतर त्याच व्यक्तीला दुसरा डोस देण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रथम प्राधान्याने आरोग्य कर्मचार्‍यांना लस देण्यात येणार असून त्यानुसार नोंदणी झालेल्या सर्व शासकीय व खासगी डॉक्टर्स, नर्सेस व इतर आरोग्य कर्मचार्‍यांना लस देण्यात येणार आहे. या लशीचे दोन डोस चार आठवड्यांच्या अंतराने देण्यात येणार आहेत.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply