Breaking News

टोकियो ऑलिम्पिकबाबत संभ्रम

टोकियो : वृत्तसंस्था

लांबणीवर टाकण्यात आलेल्या टोकियो ऑलिम्पिकबाबत काहीही घडू शकते, असे मत जपानचे संसदीय मंत्री तारो कोनो यांनी मांडले आहे. कोणत्याही परिस्थितीत सुरक्षितपणे आणि सर्वांची काळजी घेऊन टोक्यो ऑलिम्पिकचे आयोजन करण्यात येईल, असे संयोजन समिती आणि जपान सरकारद्वारे ठामपणे सांगितले जात असताना कोनो यांच्या वक्तव्याने मात्र ऑलिम्पिकबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. ऑलिम्पिक स्पर्धा रद्द होण्याला कोनो यांनी पाठिंबा दर्शवला आहे. जपानमधील 80 टक्के जनतेला ऑलिम्पिक स्पर्धा नको, असे एका मतदान चाचणीनंतर समोर आले होते. त्यातच ऑलिम्पिकबाबत काहीही घडू शकते, असे सूचक वक्तव्य कोनो यांनी केले आहे. कोनो हे जपानचे माजी सुरक्षामंत्री आणि विद्यमान प्रशासकीय आणि नियामक सुधारणामंत्री आहेत. जपानमध्ये सध्या कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू लागल्यामुळे तिथे टाळेबंदी होण्याची शक्यता आहे. अन्य देशांच्या तुलनेत जपानने कोरोनावर बर्‍यापैकी नियंत्रण राखले आहे. ऑलिम्पिकच्या आयोजनाबाबत संयोजन समितीकडे प्रतिक्रियेसाठी विचारणा केली जात आहे, मात्र त्यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. कोनो म्हणाले की, 15400 ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिकमधील खेळाडूंसह काही चाहत्यांना परवानगी दिली जाणार आहे, मात्र चाहत्यांपेक्षा आमचे लक्ष खेळाडूंकडे लागले आहे. खेळाडूंच्या सुरक्षेची जबाबदारी घेण्यात आल्यानंतर चाहते किंवा पर्यटकांचा विचार केला जाईल, पण जुलै महिन्यापर्यंत काहीही घडू शकते. ऑलिम्पिक समितीने आतापासूनच नव्या रणनीतीची आखणी करावी. सध्याची परिस्थिती खडतर असून पर्यायी योजना तयार ठेवावी लागणार आहे. ऑलिम्पिक स्पर्धा पुन्हा लांबणीवर टाकण्यात येणार नाही. या वेळी ही स्पर्धा आयोजित करणे शक्य नसल्यास रद्द केली जाईल, असे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (आयओसी) अध्यक्ष थॉमस बाख यांनी स्पष्ट केले आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply