Breaking News

कशेडी घाटातील भुयारी मार्ग : मोठा प्रोजेक्ट अपारदर्शकतेत!

बिरबल आणि अकबराच्या कथेतील लाडू या प्रसंगामध्ये अकबराचा मेव्हणा आणि बिरबलाला वेगवेगळया बंद खोलीत डांबून त्यांच्यासमोर रोज शंभर बुंदीचे लाडू ठेऊन ते भुकेवर कसे नियंत्रण ठेवतात, हे पाहण्याची पैज लागली होती. अकबराच्या मेव्हण्याला भुक अनावर झाल्याने त्याने काही लाडू फस्त केल्याचे रोज दिसून येत असे तर बिरबलाच्या खोलीतून शंभर लाडू परत येत असल्याचे पाहून अकबराला आश्चर्य वाटत होते. शेवटी आठवडयानंतर अकबराला बंद खोलीतून बाहेर काढल्यानंतर अकबराला बिरबल ठणठणीत असल्याचे पाहून आश्चर्याचा धक्काच बसला. ’शंभर बुंदीच्या लाडूंपैकी एकही लाडू तु न खाता सर्व शंभर लाडू परत पाठवित होतास, तरीही तुझ्या चेहर्‍यावर कुठेही भुकेची जाणीव दिसून कशी येत नाही?’ असे अकबराने बिरबलाला उत्कंठापूर्वक विचारले. यावर बिरबलाने अतिशय नम्रपणे व प्रामाणिकपणे सांगितले. ’सम्राट, भूक ही मानवाची सहजभावना आहे मात्र, मानवाला विचार करण्यासाठी मेंदूही इश्वराने दिला आहे. बंद खोलीमध्ये भूक चाळविल्यानंतर समोर असलेले लाडू खावेसे वाटणे स्वाभाविक होते. मी फक्त एवढेच केले की, माझ्याजवळ वेळ खुप असल्याने प्रत्येक बुंदीच्या लाडूंमधील बुंद्या काढून एकेक बुंदी खाल्ली. त्यामुळे लाडूंची संख्या शंभरच राहिली आणि माझी भूकही भागली.’

भारतातील या लोकप्रिय कथेतून भारतीय राजकारणी व सरकारी अधिकारी यांनी भ्रष्टाचार कसा करायचा याची गाढ शिकवण घेऊन मानवाला विचार करण्यासाठी मेंदूही इश्वराने दिला आहे, त्या मेंदूचा योग्य वापर करून बेमालूमपणे अव्याहतपणे भ्रष्टाचार सुरू ठेवला आहे. मात्र, जनतेच्या मतदानापुरत्या मर्यादित अधिकारामुळे जनता सत्ताधिशांना सवाल करू शकत नाही आणि अधिकार्‍यांना जाब विचारू शकत नाही. मात्र, यामुळे अपारदर्शकतेचा प्रभाव या कामात मोठया प्रमाणात दिसून येत आहे. रायगड जिल्ह्यातील पनवेल ते इंदापूर या पहिल्या टप्प्यातील रखडलेले चौपदरीकरणाचे काम प्राधान्याने पूर्ण करून त्यानंतर इंदापूर ते माणगांव तालुक्यातील वडपाले आणि महाड तालुक्यातील वीर ते पोलादपूर तालुक्यातील  भोगाव खुर्द असे रायगड जिल्ह्यातील दोन टप्पे गृहित धरण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात माणगाव येथे बायपास रोडची तरतूद असून दुसर्‍या टप्प्यात पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटादरम्यान भुयारी मार्गाची तरतूद समाविष्ट करण्यात आली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यासह सिंधुदूर्ग जिल्ह्यात या चौपदरीकरणाचा उर्वरित भाग येत असून रत्नागिरी जिल्ह्यातील काही पुलांचे बांधकाम डिसेंबर 2016 मध्ये सुरू करण्यात आले. उर्वरित पुलांचे काम 2017 च्या प्रारंभी सुरू झाले. या कामाचे सात भाग ढोबळ मानाने निश्चित करण्यात आले असून रायगड जिल्ह्यात इंदापूर ते वडपाले (माणगाव बायपास प्रस्तावित) 24 कि.मी., वीर ते भोगाव खुर्द 40 कि.मी., भोगाव खुर्द ते खवटी 14 कि.मी. (रत्नागिरी ता. खेड) 500 कोटी रूपये अंदाजे खर्च (1.7 कि.मी भुयारी मार्ग) तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील 44 कि.मी. रस्ता चौपदरीकरण अंदाजे खर्च 579 कोटी रूपये, चिपळूण तालुक्यातील 38 कि.मी. रस्ता चौपदरीकरण अंदाजे खर्च 670 कोटी रूपये, संगमेश्वर तालुक्यातील 40 कि.मी. रस्ता चौपदरीकरण अंदाजे खर्च 592 कोटी रूपये (आरवली आणि सोनवी), रत्नागिरी ते लांजा 51 कि.मी. रस्ता चौपदरीकरण अंदाजे खर्च 826 कोटी रूपये, राजापूर तालुक्यातील 35 कि.मी. रस्ता चौपदरीकरण अंदाजे खर्च 660 कोटी रूपये (राजापूर आणि वाकेड), याखेरिज, सिंधुदूर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील 38  कि.मी. रस्ता चौपदरीकरण अंदाजे खर्च 450 कोटी रूपये (बेलना व पियाली), कुडाळ तालुक्यातील 44 कि.मी. रस्ता चौपदरीकरण अंदाजे खर्च 579 कोटी रूपये (गड, बन्सल आणि पिडवल),असे हे सात भाग आहेत.

पोलादपूर ते खेड या दरम्यान असलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगातून असणार्‍या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या डोंगरातून खेड बाजूने हे काम सुरू झाल्यानंतर आजमितीस साधारणपणे 200 मीटर अंतराचा भुयारी मार्ग झाला आहे. सह्याद्रीचा कातळ फोडून प्रत्येकी तीन पदरी महामार्गावरून दोन मार्गिका उभारण्याचे काम सुरू झाले असून हे काम पूर्ण होईल तेव्हा 1.84 किलोमीटर भुयारी मार्ग कशेडी घाटाला पर्याय म्हणून पूर्ण झाला असेल. 2019 साली नोव्हेंबर महिन्यामध्ये सुरू झालेले हे काम एप्रिल 2021 पर्यंत पूर्ण होईल अशी अपेक्षा असून या कामासाठी सुमारे 200 कोटी रुपये खर्च होणे अपेक्षित आहे तसेच या भुयारी मार्गाच्या दुतर्फा ऍप्रोच रस्ते करण्याची गरज असून 441 कोटी रुपये या भुयारी मार्गाचा एकूण खर्च होणे शक्य आहे. यासोबतच आपत्कालामध्ये उपयुक्त असलेले वायुविजन सुविधेचे एक भुयारदेखील यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाट हा कोकणाचे प्रवेशद्वार म्हणून ओळखला जात असला तरी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने होत असलेल्या अपघातांमुळे शापित ठरला आहे. सध्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 चे चौपदरीकरण सुरू असून या कशेडी घाटामध्ये रस्त्याचे चौपदरीकरण शक्य नसल्याने इंडियन बोगदा खणून रस्ता करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या घाटातील प्रस्तावित 3.44 किलोमीटर लांबीचा बोगदा तयार करण्याचे काम रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने निविदा मंजूर झाल्याने स्वीकारले असून 441 कोटी रुपयांचा खर्च याकामी होणे अपेक्षित आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 म्हणजेच पदवीचा मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 17 च्या पुनर्वसन आणि सुधारण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने तीन वर्षांर्पूर्वी इंजिनियरींग प्रॉक्युआरमेंट आणि कन्स्ट्रक्शन यांच्यासोबत 441 कोटी रुपयांचा करार केला आहे. त्यामुळे कशेडी घाटातील प्रस्तावित बोगदा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बनविताना 2 तीन पदरी बोगदे तयार करण्यात येणार आहेत. यातील करारानुसार आपण 7.2 किलोमीटर लांबीचा आधुनिक दर्जाचा पक्का रस्ताही प्रस्तावित केला असून या रस्त्याचे काम देखील रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच करीत आहे. मात्र, यादरम्यान, पोलादपूर सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेला भोगाव बुदु्रक ते कातळी हा जिल्हा रस्ते विकास संस्था अलिबागमार्फत झालेला रस्ता गायब झाल्याने या कामातील अपारदर्शकता स्पष्ट होत आहे.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 441 कोटींच्या कराराची बोली लावताना रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीसह सीएआय युक्रेन प्रमाणेच जगभर प्रसिध्द असलेल्या अनेक कंपन्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये सार्वजनिक क्षेत्रात विज मेट्रो, रेल्वे, परमाणू ऊर्जा प्रकल्प, हवाई गुणवत्ता नियंत्रण, समुद्र, बंदर आणि पायाभूत प्रकल्पांसाठी कार्यरत असलेल्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला या कामाची संधी देण्यात आली. त्यामुळे कशेडी घाटाचा पर्यायी रस्ता असलेला कशेडी बोगदा दर्जेदार आणि आधुनिकतेचा डौल घेऊन तयार होणार आहे. कशेडी घाटातून लागणार्‍या प्रवासाच्या वेळेपेक्षा कशेडी बोगद्यातून लागणारा प्रवासाचा वेळ निश्चितच कमी असेल अशी कोकणातील पर्यटक, प्रवासी आणि चाकरमान्यांना आशा निर्माण होऊ शकेल. कशेडी घाटाच्या पर्यायी रस्ता असलेल्या कशेडी बोगद्यामध्ये जाण्यासाठी तीन पदरी आणि येण्यासाठी तीन पदरी रस्ता असलेले दोन बोगदे साकारले जाणार आहेत. सह्याद्री पर्वतराजींचा कातळ फोडून कोकण रेल्वेचा करबुडे लोहमार्ग ज्याप्रमाणे बोगद्यातून नेण्यात आला त्याप्रमाणेच खेड आणि पोलादपूर या दरम्यान हे दोन बोगदे निर्माण करण्यात येणार आहेत. राष्ट्रीय महामार्ग विकास कार्यक्रमांतर्गत एनएडीपी 4 मंत्रालयाच्या अंतर्गत आयोगाने हा प्रकल्प 30 महिन्यामध्ये पूर्ण करण्याचे सूचित केले आहे. 31 ऑॅक्टोबर 2017 पर्यंत टेंडर भरण्याची अंतिम मुदत होती त्यामुळे टेंडर प्रक्रिया 2018 च्या सुरुवातीलाच पूर्ण झाली होती. नियोजित बोगद्यांपर्यंत सर्व अत्याधुनिक यंत्रसामुग्री जाण्यासाठी रस्त्यांचा ठेका घेतलेल्या कंपन्यांनी सक्षम रस्ते बनवल्यानंतर या कामाला सुरुवात होणार असून केवळ 30 महिन्यांमध्ये दोन्ही बोगद्यांचे काम पूर्ण केल्यानंतर दोन्ही बोगद्यांची देखभाल व दुरुस्ती करण्याचे कामदेखील रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला देण्यात आले आहे. त्यामुळे कशेडी घाट व त्यावर असलेल्या नागमोडी वळणांचा, खोल दरीचा, डोंगरातून कोसळणार्‍या दरडींचा, अचानक निर्माण होणार्‍या वाहतुकीच्या कोंडीचा तसेच सर्व प्रकारच्या अपघातजन्य परिस्थितीचा विचार करून हे दोन्ही बोगदे तातडीने पूर्णत्वास जाण्यासाठी राज्य सरकार आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर ह्या दोन्हींच्या समन्वयातून भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लावून कसोशीने प्रयत्न सुरू झाला. एकिकडे, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुसर्‍या टप्प्यातील वीर ते कातळी बोगद्यापर्यंतच्या कामात वनविभागाची परवानगी आणि भूसंपादनाचा अडथळा असताना या बोगद्याच्या कामात रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या सहभागामुळे अनेक अडचणी निर्माण होण्यापूर्वीच आश्चर्यकारकरित्या दूर झाल्या आहेत.

कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गासाठी एक अत्याधुनिक भुयार खोदकामाचे यंत्र म्हणजेच बुमर वापरण्यात येत असून याद्वारे तीन ते चार मीटर लांबीचे कातळ फोडले जात आहे. 20 मीटर रुंदी आणि 6.5 मीटर उंची अशा पध्दतीने भुयाराचे खोदकाम करण्यास बूमर यंत्राचा उपयोग होत आहे. भुयारामध्ये महत्वाच्या ठिकाणी सुरुंग स्फोटासाठी जिलेटिनचा वापर होत असून भुयारामध्ये पडलेले कातळ व मोठमोठे दगड बाहेर काढण्यासाठी यंत्राचा वापर केला जात आहे. हे कातळाचे दगड मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरण कामांमध्ये वापरण्यात येत असून दोन्ही भुयारी मार्ग एकमेकांपासून वेगवेगळे असतील, असे दिसून येत आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कशेडी घाटातील प्रवासाचे अंतर या भुयारी मार्गामुळे सुमारे 4.5 किलोमीटरने कमी होण्याची शक्यता आहे तसेच वाहनचालकांना कशेडी घाटातून धोकादायक वळणावरून गाडी चालवताना संभाव्य धोका यामुळे कमी होणार आहे. कशेडी घाटात दरड कोसळल्यामुळे घाट रस्ता बंद ठेवण्याच्या घटनादेखील या भुयारी मार्गामुळे टळणार आहेत. या कामाची निर्धारित मुदत एप्रिल 2021 पर्यंत अपेक्षित असताना अजूनही दोन ते तीन महिन्यांमध्ये दोन्ही बाजूने हा भुयारी मार्ग खुला होण्यासाठी अवधी लागणार आहे.

या भुयारी मार्गातील होणारा विलंब तसेच या कामाचे ठिकाण नियोजित संकल्पचित्रापेक्षा काही अंतरावर टेकडीच्या निमुळत्या भागात होत असल्याने अपारदर्शकता निर्माण झाली आहे. याबाबत बिरबलाचे लाडूभोजन झाल्याची शक्यता निर्माण झाली असून याकामी ऍप्रोच रोडची लांबी वाढली तर भुयाराची नियोजित लांबी कमी होण्याची शक्यता दिसून येत आहे, मात्र्र, यासंदर्भात खुलासा करण्याची कोणासही फुरसत नाही कारण सर्वांचे उत्तरदायित्व लॉकडाऊनमध्ये बंद आहे.

-शैलेश पालकर, खबरबात

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply