अलिबाग : प्रतिनिधी
रेवस पंचक्रोशीतील गावांना प्राधान्याने पाणी गेले पाहिजे, मात्र तेथील बोअरवेलला, विहिरींना मचूळ पाणी आहे. त्या गावकर्यांना एमआयडीसीचाच आधार आहे, पण जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाच्या नियोजनशून्य कारभाराने ते मिळणार नाही, असा दावा पत्रकार परिषदेत करून समाजकल्याण सभापती दिलीप भोईर यांनी घरचा आहेर दिला आहे. रेवस, कोप्रोली, मिळखतखार, सारळ आणि डावली रांजणखार उर्फ नवखार या पाच ग्रामपंचायतींच्या सरपंचानी 15 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पाण्यासाठी लाक्षणिक उपोषण केले होते. त्या वेळी समाजकल्याण समिती सभापती दिलीप भोईर यांच्यावर अनधिकृत नळ जोडणी दिल्याचा आरोप झाला होता. त्यावर आपले म्हणणे मांडण्यासाठी दिलीप भोईर यांनी मंगळवारी (दि. 17) जिल्हा परिषद कार्यालयातील आपल्या दालनात पत्रकार परिषद बोलावली होती, त्या वेळी ते बोलत होते. उपोषण करणार्या पाचही ग्रामपंचायतींच्या सरपंचांची भूमिका रास्त होती. त्या गावांना पाणी मिळत नसल्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलले, पण त्याला अनेक कारणे आहेत. त्यामध्ये जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचा नियोजनशून्य कारभारही तितकाच कारणीभूत आहे, असा आरोप त्यांनी या पत्रकार परिषदेत केला. रेवस परिसरातील गावांना पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी केवळ झिरड नाही, तर सर्व गावांमधील अनधिकृत नळ जोडण्या तोडाव्यात, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली. झिराडमध्ये पाझर तलावाचा प्रकल्प राबविण्यात येत असल्याने तेथे 25 लाख लिटर क्षमता असलेल्या पाणी साठवण टाकीची मागणी केली आहे. त्यामुळे झिराडसह काही गावांचा पाणी प्रश्न मार्गी लागू शकतो, असे भोईर म्हणाले. झिराड ग्रामपंचायतीच्या अनधिकृत पाणी जोडणीवर आक्षेप घेणार्यांनी केवळ राजकीय हेतूने आरोप केले आहेत. झिराडला लक्ष करून आपल्यावर चिखलफेक करण्यात येत आहे. एमआयडीसीचे पाणी विहिरीत घेतले जाते, त्यावर टँकर चालतात, तेथे पाण्याचा धंदा होतो, त्याकडे दुर्लक्ष केले जाते, असे भोईर म्हणाले. जि. प.च्या नियोजनशून्य कारभारामुळे रेवस पंचक्रोशीतील गावांमध्ये पाणीटंचाई भेडसावत आहे. अनधिकृत नळ जोडण्या तोडण्यास आमचा आक्षेप नाही, पण ही कारवाई सर्व अनधिकृत जोडण्यांवर व्हावी, असेही समाजकल्याण सभापती दिलीप भोईर यांनी नमूद केले.