पनवेल येथील प्राथमिक फेरीला सुरुवात
पनवेल : रामप्रहर वृत्त
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने यंदा जानेवारी 2021 मध्ये सातवी अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेविषयीची माहिती जास्तीत जास्त रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहचावी म्हणून पनवेल येथील ओरियन मॉलमध्ये रंगमंच आमचा कलाविष्कार तुमचा हा प्री इव्हेंट शनिवारी (दि. 23) झाला.
अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या पार्श्वभुमीवर पनवेल येथील ओरियन मॉलमध्ये रंगमंच आमचा कलाविष्कार तुमचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये विविध खेळ व उपक्रम घेऊन नाट्यक्षेत्राविषयी आणि स्पर्धेविषयी माहिती देत प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण करण्यात आली. या कार्यक्रमाला नाट्यप्रेमींचा चांगला प्रतिसाद लाभला.
या वेळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेच्या सहकार्यवाहक स्मिता गांधी, अयुफ अकुला, पवित्रा शेरावत, हितेश स्वामी, अदित्य पुंडे, रोहित देशमुख, श्वेता अचरे, ओमकार सोसते, सृष्टी शिपुरकर आदींच्या नियोजनाखाली हा प्री इव्हेंट करण्यात आला.