पनवेल : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेतील सेवकांची विश्वासार्ह अर्थवाहिनी असणार्या रयत सेवक को-ऑपरेटिव्ह बँकेचा 80वा वर्धापन दिन सोहळा येथील संस्थेच्या गव्हाण कोपर येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात झाला. या वेळी संस्थेच्या रायगड विभागातील सेवकांच्या गुणवंत पाल्यांना रोख पारितोषिके सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. विशेष पुरस्कारप्राप्त सेवकांचाही सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ प्रदान करून सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय भाषणात लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी बँकेच्या स्वच्छ व पारदर्शक कारभाराचा गौरव केला तसेच सर्व विजेत्या पारितोषिकप्राप्त विद्यार्थी व सेवकांबद्दल प्रशंसोद्गार काढले. या सोहळ्यास संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व समन्वय समिती सदस्य तथा विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन अरुणशेठ भगत, संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व समन्वय समिती सदस्य जे. एम. म्हात्रे, संस्थेच्या उच्च शिक्षण समितीचे सदस्य व जनरल बॉडी सदस्य कामगार नेते महेंद्र घरत, स्थानिक शाळा समितीचे ज्येष्ठ सदस्य अनंताशेठ ठाकूर, विश्वनाथ कोळी, ग्रामपंचायत सदस्य विजय घरत, योगिता भगत, माई भोईर, कामिनी कोळी, उषा देशमुख, सुनिता घरत आदींसह रयत को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन पोपटराव पवार, व्हाईस चेअरमन लालासाहेब खलाटे, रयत शिक्षण संस्थेचे कॉर्डिनेटर डी. एस. सूर्यवंशी, सर्व संचालक, विद्यालयाच्या प्राचार्य साधना डोईफोडे, उपप्राचार्य राजकुमार चौरे, पर्यवेक्षक दीपक भर्णुक, लाईफ मेंबर व बँकेचे संचालक प्रमोद कोळी, लाइफ वर्कर रवींद्र भोईर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बँकेचे चेअरमन पोपटराव पवार यांनी केले. सागरकुमार रंधवे यांनी सूत्रसंचलन केले, तर प्रमोद कोळी यांनी आभार मानले.