उरण : वार्ताहर
उरण तालुक्यातील चिरले ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रियांका दीपक मढवी, माजी सरपंच व विद्यमान सदस्य निवृत्ती धनाजी पाटील, तत्कालीन ग्रामसेवक आसावरी रंजित कदम, रघुनाथ द. म्हसे आणि विद्यमान ग्रामसेवक वैभव धनाजी घरत यांनी आपापसात संगनमत करून केवळ पैशाच्या हव्यासापोटी गैरवर्तणूक व अधिकारपदाचा गैरवापर करीत ग्रामपंचायतीची प्रोसिडिंग घरी नेऊन त्यात फेरफार केला आहे. या प्रकरणी त्यांना दोषी धरून पदावरून पायउतार करावे यासाठी तिसरी तक्रार जांभूळपाडा येथील नागरिक दीपक पाटील यांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे दाखल केली आहे. या प्रकरणी कोकण आयुक्तांनी रायगड जिल्हा परिषदेला चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या संदर्भात दीपक पाटील यांनी म्हटले आहे की, चिरले ग्रामपंचायतीची मासिक सभा 15 फेबु्रवारी 2018 रोजी झालेली होती. त्यामध्ये एकूण 170 ठराव झाले असून, नऊ अर्जांचे वाचन केले होते आणि त्यानंतर अर्धे पान रिकामे राहिले होते. त्यावर ग्रामसेवक/सचिव यांनी आडवी रेषा ओडलेली होती. ही माहिती 4 ऑगस्ट 2020 रोजी माहितीच्या अधिकारान्वये मिळविलेली होती. या प्रकरणात काहीतरी गौडबंगाल असल्याचे समजल्यानंतर पुन्हा माहिती अधिकारान्वये 28 डिसेंबर 2020 रोजी माहिती मिळविली असता, दोन माहितींमध्ये तफावत आढळून आली आहे. पहिल्या माहितीमध्ये ठराव नं. 170मध्ये नऊ अर्जांचे वाचन झाले होते, मात्र सरपंच, माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य आणि ग्रामसेवकांनी संगनमत करून अधर्वट आडवी रेषा ओढलेल्या ठिकाणी पुन्हा नव्याने बेकायदेशीर व बनावट अतिरिक्त लिखाण करून पूर्वी झालेल्या मासिक सभेच्या ठरावांमध्ये बदल करून गैरवर्तणूक केली. ही बाब काही सदस्यांना समजल्यानंतर त्यांनी रितसर लेखी तक्रार ग्रामपंचायत आणि उरण पंचायत समितीकडे दाखल केली आहे. दरम्यान, चिरले ग्रामपंचायतीवर संबंधित अधिकार्यांचा अंकुश नसल्याचा आरोप करीत कर्तव्य पालनात कसून व गैरवर्तणुकीस पात्र धरून न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. याकामी कोकण विभागीय आयुक्तांच्या न्यायालयात दाखल केलेल्या तक्रारीवरून कोर्टाने रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना चौकशीचे आदेश दिले. हा चौकशी अहवाल सादर होऊन संबंधितांवर काय कारवाई होणार याकडे चिरले परिसरासह उरण तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, ग्रामसेवक वैभव घरत यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.