महाड : प्रतिनिधी
मतदान जागृती (स्विप) कार्यक्रमांतर्गत महाडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये रविवारी (दि. 14) जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी व महाड उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार, जिल्हा नियोजन अधिकारी व नोडल अधिकारी सुनील जाधव यांच्या उपस्थितीमध्ये मतदार जागृती कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मानवी साखळी तयार करून मतदान जागृती केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून आगामी लोकसभा निवडणुकींमध्ये अधिकाधिक मतदान होण्याच्या दृष्टीने जनजागृती व्हावी
यासाठीच मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते. या मानवी साखळीमध्ये येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील दीड हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. या साखळीतून विद्यार्थांनी रायगड जिल्ह्याची प्रतिकृती साकारून मतदान जागृती कार्यक्रमाला सुरुवात केली. या प्रतिकृतीमध्ये भारत निवडणूक आयोगाचे चिन्ह आणि मतदान केलेल्या मतदाराचे बोट प्रतीकात्मक साकारण्यात आले होते.
महाड निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मतदान करण्याविषयी शपथ दिली. विद्यार्थ्यांनी शपथ घेताना घोषणाही दिल्या. या घोषणांनी सारा आसमंत दणाणून गेला होता. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनाजी गुरव, प्राध्यापक सोनार, वाळण येथील न्यू इंग्लिश स्कूलचे नितीन गुरव यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे चित्रीकरण ड्रोन कॅमेर्याच्या मदतीने करण्यात आले आहे. या विशेष मतदान जागृती कार्यक्रमाला महाडचे तहसीलदार चंद्रसेन पवार, माणगावच्या तहसीलदार प्रियांका आयरे, पोलादपूरच्या तहसीलदार प्राजक्ता घोरपडे, नायब तहसीलदार प्रदीप कुडळ यांच्यासह मंडल अधिकारी, तलाठी, शहरातील नागरिक उपस्थित होते.
