Breaking News

माणगावमध्ये लग्नघरी पापड-फेण्यांची परंपरा

माणगाव : सलीम शेख

सण, उत्सव वा घरगुती सोहळ्याच्या निमित्ताने करण्यात येणार्‍या लग्नी पापड, फेण्यांची परंपरा माणगावात आजही जपली जात असून, ग्रामीण संस्कृतीची ओळख असणारी ही परंपरा आजही टिकून आहे.ग्रामीण भागातील लग्न म्हणजे संपूर्ण गावाचा सोहळा असतो. लग्न समारंभाच्या तयारीसाठी गावातील बहुसंख्य लोक यजमानांना मदतीचा हात देतात. यामध्ये महिलांचे प्रमाण सर्वात जास्त असते. लग्न समारंभात जेवणासोबत हमखास असणारे पापड, फेण्या यांना वर्‍हाडी मंडळींचीही पसंती असते.

पापड, फेण्या नसतील तर जेवणावळ पूर्णच होत नाही. त्यामुळे पापड, फेण्या या सर्वांचेच आकर्षण असते. लग्नघरातील मंडळींना पापड, फेण्या करण्यासाठी ग्रामीण भागात आजही गावातील महिला सामूहिक मदत करतात. एक दोन दिवस शेजारील महिला, नातेवाईक यजमानीन महिलेला मदत करतात व पाच ते दहा किलो उडदाच्या डाळीचे पापड तसेच तांदळाच्या फेण्याही करतात.उडदाची डाळ दळण्यापासून ते पापड फेण्या वाळवून डबाबंद करून यजमानबाईंकडे सुपूर्द करेपर्यंतची सर्वकामे या गावातील महिलाच करतात. साधारणपणे दोन ते तीन हजार पापड या महिला लग्न समारंभासाठी तयार करतात. यामध्ये कोणतीही मजुरी घेतली जात नाही. जेवण, नास्ता याची कोणतीच अपेक्षा नसते. लग्नघराला मदत म्हणून ही सर्व कामे ग्रामीण भागातील महिला आवडीने करीत असतात.सामुदायिक एकतेेचे दर्शन तसेच सण, समारंभ, लग्नादी सोहळ्यातील मदतीची भावना या लहान लहान प्रथांमधून टिकून असून, माणगाव ग्रामीण भागात जपली जाणारी ही लग्नी पापड, फेण्यांची परंपरा आगळेवेगळे वैशिष्ट्य आहे.

लग्न समारंभात मोठ्या प्रमाणात पापड, फेण्या लागतात. गावातील महिला एकत्र येत लग्नघराला पापड, फेण्या करून देतात. मदतीच्या भावनेतून गावातील महिला हे काम करत असतात. ही प्रथा आजही टिकून आहे. -अ. वि. जंगम, निवृत्त मुख्याध्यापक, माणगाव

ग्रामीण भागात लग्नसोहळ्यातील जेवणावळीसाठी गावातील महिला व मुली एकत्र येऊन पापड, फेण्या करून देतात. यासाठी दोन ते तीन दिवस जातात. मदतीच्या भावनेतून हे काम होते. -चंद्रभागा खडतर, जाणकार, माणगाव

Check Also

राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा शुभारंभ

स्पर्धा प्रमुख परेश ठाकूर यांची जळगाव केंद्रावर उपस्थिती जळगाव ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर …

Leave a Reply