इंटरनेटच्या जमान्यात डॉक्टरांना सातत्याने रुग्णांच्या अर्धवट ज्ञानाचा सामना करावा लागतो. इंटरनेटचा सहज आणि सर्रास वापर करणार्या सुशिक्षित रुग्णांमध्ये ही समस्या अधिक आढळून येते. अशा परिस्थितीत औषधांच्या दुकानांमध्ये सहजपणे उपलब्ध होणार्या औषधांचा रुग्णांकडून बेपर्वाईने अमर्याद वापर होण्याची शक्यता कमालीची वाढते.
डोकेदुखी, सर्दी-खोकला, ताप, अॅसिडिटी आदी तक्रारींवरील औषधे रुग्णांकडून फारसा विचार न करता सर्रास घेतली जातात. रॅनटॅक, झिंटॅक, अॅसिलॉक ही अॅसिडिटीवरील औषधे याच श्रेणीत मोडणारी आहेत. डॉक्टरांना न विचारता बहुतेक जण सर्रास या गोळ्यांचा वापर करतात. जागतिक स्तरावरील काही गंभीर घडामोडीनंतर राज्यात रॅनिटिडिन या औषधाचा समावेश असलेल्या या सार्या गोळ्यांवर आता तात्पुरती बंदी आणली गेली आहे. रॅनिटिडिन या औषधाचा वापर राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्याचे आदेश आरोग्य संचालनालयाने नुकतेच दिले. राज्यातील अन्न आणि औषध प्रशासनाने रॅनिटिडिनच्या बाजारातील नमुन्यांची तपासणी करण्याचा निर्णयही घेतला आहे. जागतिक स्तरावर अनेक देशांमधून या औषधाविरोधात अशाच स्वरुपाची कारवाई झाल्यानंतर आपल्याकडे ही उपाययोजना केली गेली. रॅनटॅक, झिंटॅक खेरीज जवळपास 180हून अधिक बॅ्रण्ड्समध्ये रॅनिटिडिन या औषधाचा वापर केला जातो. रॅनिटिडिनमध्ये कर्करोगासाठी कारणीभूत घटक असल्याच्या संशयावरून अमेरिका आणि युरोपातील औषध नियंत्रकांनी रुग्णांना व सर्वसामान्यांना त्याची माहिती दिली आहे, तर इतर अनेक देशांमध्ये या औषधावर बंदी घालण्यात आली आहे. फ्रान्समध्ये या औषधाशी संबंधित सर्व उत्पादने बाजारातून मागे घेण्यात आली असून या औषधाचा वापर करून उत्पादन केल्या जाणार्या सर्व गोळ्यांचे उत्पादन थांबवण्यास सांगण्यात आले आहे. कॅनडातही सर्व उत्पादकांच्या रॅनिटिडिनयुक्त उत्पादनांचे वितरण थांबवण्यात आले आहे. नुकतीच बांग्लादेशातही यावर बंदी घालण्यात आली. भारतात केंद्रीय औषध नियंत्रक विभागाने राज्यांच्या अखत्यारीतील औषध प्रशासनांना रुग्णांच्या सुरक्षिततेची खबरदारी घेण्याची सूचना केली आहे. या सूचनेनुसार राज्यातील आरोग्य संचालनालयाने रॅनिटिडिनवरील तात्पुरत्या बंदीची कारवाई केली आहे. रॅनिटिडिन हे गोळ्यांखेरीज इंजेक्शनच्या स्वरुपातही उपलब्ध असून राज्यभरातील प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच जिल्हा रुग्णालयांतील त्याचा वापरही थांबवण्यात आला आहे. अमेरिकेतील एका ऑनलाइन फार्मसीने तीन आठवड्यांपूर्वी या संदर्भात भारतातील औषध नियंत्रकाशी संपर्क साधला होता. रॅनिटिडिनच्या नमुन्यांमध्ये कर्करोगासाठी कारणीभूत घटक प्रमाणित प्रमाणापेक्षा अधिक मात्रेने आढळल्याचे या फार्मसीने म्हटले होते. सिंगापूरमधील आयुर्विज्ञान प्राधीकरणानेदेखील संबंधित गोळ्यांच्या नमुन्यांची चाचणी केली व संबंधित औषधांवर तिथेही बंदी घालण्यात आली आहे. भारतात डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सर्वात आधी स्वत:हून रॅनिटिडिनयुक्त सर्व गोळ्यांच्या वितरण थांबवले. या विशिष्ट औषधासंबंधातील सत्य योग्य पडताळणीनंतर उजेडात येईलच, परंतु जे औषध आपण डॉक्टरांना न विचारता, फारसा विचार न करता सहजपणे घेत होतो, त्याच्यासंदर्भात अशा पडताळणीची वेळ येणे सर्वसामान्यांना निश्चितपणे सावध करणारे आहे.