Breaking News

‘सागरमाला’ अंतर्गत मुंबई-काशीद जलवाहतूक

सागरमाला योजनेअंतर्गत काशीद येथे मोठी जेट्टी विकसित करण्यास केंद्र शासनाने मान्यता दिली असून त्यासाठी 112कोटींचा निधी प्राप्त झाल्याने सध्या जेट्टी उभारणीच्या कामाने वेग घेतला आहे. डिसेंबर 2021अखेरपर्यंत हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाकडून देण्यात आली आहे. मुरुड तालुक्यातील काशीद समुद्र किनार्‍याचा आंतरराष्ट्रीय ठिकाणात समावेश झाल्याने येथे दरवर्षी देशी-विदेशी पर्यटकांची मोठी गर्दी असते. या समुद्र किनार्‍याला  दरवर्षी सात लाखापेक्षा जास्त पर्यटक भेट देतात. सुट्टीच्या दिवशी किमान दहा हजारपेक्षा जास्त पर्यटक येथे येतात. सध्या पर्यटक मुंबई येथून बोटीने मांडवा आणि तेथून वाहनाने अलिबाग मार्गे काशीद येथे येतात. मुंबईहुन काशीदला येताना प्रवासात किमान तीन तास वाया जातात, मुंबई-काशीद प्रवासाचे अंतर कमी व्हावे व मुंबईतील पर्यटकांना काशीद येथे जलद गतीने पोहचता यावे, यासाठी केंद्र शासनाने सागरमाला योजनेअंतर्गत 2018मध्ये काशीद येथे मोठी जेट्टी विकसित करण्यासाठी मान्यता दिली व त्यासाठी 112कोटींचा निधीही मंजूर केला. काशीद किनार्‍यावर जाता यावे, यासाठी आवश्यक ब्रेकवॉटर बंधार्‍यासह रो-रो जेट्टी, पॅसेंजर जेट्टी निर्माण करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाला पाठविण्यात आला होता. त्याला केंद्रीय पर्यावरण विभागाने मान्यता दिली आहे. मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे हा प्रकल्प रखडला होता. त्यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे काम मंदावले होते. परंतु सध्या या कामाने वेग धरला असून सदरचे काम जलद गतीने पूर्ण करण्याचा मेरी टाइम बोर्डाचा इरादा आहे. रो रो सेवेसाठी खोल समुद्रात टे-टे-स्पॉर्ट अंथरण्यात येतात त्याची सुयोग्य मांडणी केली जाते. सिमेंट काँक्रिटचे टे-टे-स्पॉर्ट बनवण्याचे काम पूर्ण झाले असून त्याचा थर समुद्रात टाकण्याची प्रक्रिया लवकरच सुरु होणार असल्याची माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे. 2021 मेपर्यंत टे-टे-स्पॉर्ट चे काम पूर्ण करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे. काशीदला थेट जेट्टीची व रो-रो सेवेची व्यवस्था केल्यामुळे मांडवा जेट्टी येथील गर्दी कमी होणार आहे. मुंबई, ठाणे, बोरिवली, विरार, कल्याण आदी भागातील लोकांना जलसेवेद्वारे थेट काशीद गाठता येणार असल्याने रस्त्यावरील प्रवासांचे किमान तीन तासांची बचत होणार आहे. मुंबई ते काशीद बोट प्रवास अवघ्या दोन तासात सुलभ होणार असल्याने पर्यटकांनी मोठा आनंद व्यक्त केला आहे. काशीद येथील सर्व कामे डिसेंबर 2021अखेर पर्यंत पूर्ण होतील असा विश्वास मेरी टाइम बोर्डाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

काशीद येथे ब्रेकवॉटर बंधार्‍यासह रो-रो जेट्टी, पॅसेंजर जेट्टी निर्माण करण्यासाठी केंद्र शासनाकडून निधी प्राप्त झाला आहे. या कामाने वेग घेतला आहे. सिमेंट काँक्रिटचे टे-टे स्पॉर्ट तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. टे-टे स्पॉर्ट अंथरण्याचे काम मे अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येईल. हा प्रकल्प पुर्ण झाल्यानंतर मुंबई, ठाणे परिसरातून पर्यटकांना लॉन्च अथवा रो-रो सेवेने अवघ्या दोन तासात काशीदला पोचता येईल. -सुधीर देवरे, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड

– -संजय करडे

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply