बाळासाहेबांची शिवसेना सीईओंच्या दालनात
खोपोली : प्रतिनिधी
अपुर्या व अनियमीत पाणीपुरवठ्याने खोपोलीतील नागरिक त्रस्त झाले आहेत. शहरातील या पाणी प्रश्नाबाबत बाळासाहेबांची शिवसेना आक्रमक झाली आहे. शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या प्रतिनिधींनी गुरुवारी (दि. 24) नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक अनुप दुरे यांच्या कार्यालयात त्यांची भेट घेऊन चर्चा केली.
खोपोली नगर परिषद कार्यालयात झालेल्या या बैठकीत शहरातील विविध भागात कमी दाबाने, अपुरा व अनिमित पाणीपुरवठा होत असल्याचे प्रशासक अनुप दुरे यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. या वेळी खोपोलीतील पाणीपुरवठ्यासंदर्भात सखोल चर्चा करण्यात आली.
दरम्यान, खोपोलीतील पाणीपुरवठ्याचा प्रश्न पुढील दोन महिन्यात कायमस्वरुपी मार्गी लावू, असे आश्वासन प्रशासक अनुप दुरे यांनी या वेळी दिले. या वेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे शहर प्रमुख संदीप पाटील, सुरेखा खेडेकर, तात्या रिठे, प्रिया जाधव, राजू गायकवाड, पत्रकार अमोलराजे बांदल, मेहबूब जमादार, प्रवीण जाधव, विवेक आंग्रे, रुपेश देशमुख, अनुराग कोंदवले, नगर परिषदेचे अभियंते विनय शिपाई आदी उपस्थित होते.