चमोलीत जे घडले तो निसर्गाचा रुद्रावतार होता की शेजारील चीनने घडवून आणलेला घातपात याची चर्चा समाजमाध्यमांमध्ये होत आहे. निसर्गाचा प्रकोप म्हटले तरी तोही विकासाच्या नावाखाली मानवाने ओढवून घेतलेल्या संकटाचाच चेहरा आहे असे म्हणता येईल. वारेमाप जंगलतोड, भौगोलिक रचनेकडे संपूर्ण दुर्लक्ष करून भराभरा उभी राहणारी बांधकामे, हवामानातील बदल अशी अनेक कारणे या आपत्तीमागे असू शकतील. त्याची चर्चा तज्ज्ञ मंडळी करतीलच. सध्या तरी केंद्र सरकार व उत्तराखंडातील राज्य सरकार यांनी मदतकार्यावर सारे लक्ष केंद्रित केले आहे. उत्तराखंडातील चमोली जिल्ह्यात हिमनदीचा प्रवाह नदीमध्ये कोसळून उडालेला हाहाकार कित्येक तास उलटून गेले तरी शमलेला नाही. पुनर्वसनाचे काम अहोरात्र सुरू असले तरी आघातच इतका मोठा आहे की यातून सावरायला दीर्घकाळ जावा लागेल. आजमितीस 32 दुर्दैवी जीवांचे मृतदेह हाती लागले असून, किमान 175 जण बेपत्ता आहेत. हिमनदीचा एक प्रचंड मोठा तुकडा धौलीगंगा नदीत कोसळून तयार झालेल्या थंडगार पाण्याच्या प्रचंड मोठ्या लोंढ्याने वाटेतील धरण फोडून काढले आणि आसपासचा अवघा परिसर जलमय झाला. या लोंढ्यात किती जण वाहून गेले याचा शोध अद्याप सुरूच आहे. गेल्या काही वर्षांतील सरासरीपेक्षा हिमालयात यंदा तुलनेने कमी बर्फवृष्टी झाली. त्यामुळे ही दुर्घटना घडली असावी असा दावा काही हवामानतज्ज्ञ करीत आहेत. त्यात थोडेफार तथ्य आहेच. कारण दमदार बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत होत असले तरी हिमाच्छादित प्रदेशात त्याचा भौगोलिक संतुलन राखण्यासाठी फायदाच होतो. हिमनद्या म्हणजेच ग्लेशिअर हे अंशत: प्रवाही असतात. म्हणजेच थिजलेली, गोठलेली बर्फाची एक नदी अत्यंत धीम्या गतीने उताराकडे सरकत असते. या हिमप्रपाताला ग्लेशिअर असे म्हणतात. अशाच एका ग्लेशिअरचा प्रचंड भाग कमी बर्फवृष्टीमुळे कमकुवत झाल्याने नदीत कोसळला असावा असा या क्षेत्रातील जाणकारांचा अंदाज आहे. या आपत्तीमागील खरी कारणे यथावकाश समजतीलच, परंतु पुन्हा असे काही घडू नये यासाठी मात्र काळजी घ्यायलाच हवी. निसर्गाच्या रुद्रावतारापुढे माणसाचे काहीही चालत नाही. निसर्गाच्या अंगाखांद्यावर बागडणार्या मानवप्राण्याने केवळ स्वार्थासाठी बेदरकार वर्तणूक केली. त्याचेच परिणाम आता भोगावे लागत आहेत. चमोलीमधील आपत्तीमध्ये प्राण गमावलेल्यांमध्ये काही सामान्य नागरिक आहेत, तसेच तसल्या भयंकर थंडीत बोगद्यामध्ये काम करणारे कामगारदेखील आहेत. एका बोगद्यामध्ये दीडएकशे कामगार असल्याची भीती व्यक्त होत आहे. दुर्घटनेला दोन दिवस उलटून गेले असल्याने ते वाचण्याची शक्यता क्षणाक्षणाला अंधुक होत चालली आहे. संयुक्त राष्ट्रांनी आणि अन्य काही देशांनी भारतावर कोसळलेल्या या नैसर्गिक आपत्तीबद्दल सहानुभूती व्यक्त केली असून मदतीची तयारी दर्शवली आहे, परंतु आपल्या इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिसांच्या जवानांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. धौलीगंगेच्या प्रवाहात वाहून जाणार्या नागरिकांना आणि जनावरांना वाचवताना आयटीबीपीच्या जवानांनी पराक्रमाची शर्थ केली. अजून तरी आपल्याला आंतरराष्ट्रीय मदतीची गरज भासलेली नाही ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणावी लागेल. हिमप्रपातामुळे चमोलीमध्ये उडालेला हाहाकार आपल्याला खूप काही शिकवून जाणारा आहे. पर्यावरणाचे रक्षण आपण केले नाही, तर पर्यावरणदेखील आपले रक्षण करणार नाही हा मूलभूत धडा आपण सार्यांनीच आत्मसात केला पाहिजे.
Check Also
अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर
मुलीवर अत्याचार करणार्या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …