Breaking News

भाजपसाठी ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे त्याग आणि योगदान अमूल्य -आमदार गणेश नाईक

नवी मुंबईमध्ये कार्यकर्त्यांशी हितगुज संवाद मेळावा
नवी मुंबई : बातमीदार
केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या लोककल्याणकारी सरकारला 30 मे रोजी नऊ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्त देशभर मोदी9 हे विशेष जनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत ज्येष्ठ कार्यकर्त्यांबरोबर संवाद आणि हितगुज कार्यक्रमाचे आयोजन लोकनेते आमदार गणेश नाईक यांच्या वतीने ऐरोली विधानसभा मतदार संघासाठी बुधवारी (दि. 7) करण्यात आले होते. कोपरखैरणे येथे झालेल्या या हृदयस्पर्शी मेळाव्याला पक्षाच्या ज्येष्ठ आणि जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. भाजपच्या आतापर्यंतच्या वाटचालीमध्ये आणि प्रगतीमध्ये पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा त्याग आणि योगदान अमूल्य आहे, असे प्रतिपादन या वेळी आमदार नाईक यांनी केले. कोपरखैरणे येथील रा. फ. नाईक विद्यालयाच्या पटांगणावर हा संवाद मेळावा झाला. माजी आमदार संदीप नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली या मेळाव्याचे सुरेख आयोजन करण्यात आले होते. माजी खासदार डॉ. संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक, ज्येष्ठ कार्यकर्ते भगवानराव ढाकणे, गोपाळराव गायकवाड, श्री. शेरे, व्ही टी पाटील, श्रीरंग महाराज बोराडे, त्रिवेणी सालकर, ज्येष्ठ कार्यकर्ते अरुण पडते, मावळते महापौर जयवंत सुतार, माजी महापौर सुधाकर सोनवणे, माजी स्थायी समिती सभापती अनंत सुतार, माजी सभागृह नेते रवींद्र इथापे, माजी स्थायी समिती सभापती नवीन गवते, ज्येष्ठ माजी नगरसेविका कमल पाटील, माजी सभापती डॉक्टर जयाजी नाथ, माजी सभापती केशव म्हात्रे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ओडिसा येथे झालेल्या दुर्दैवी रेल्वे अपघातातील मृत देशवासियांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पंतप्रधान मोदी यांच्या काळात देशाने साधलेल्या विकासाची ’ सेवा सुशासन, गरीब कल्याण’ चित्रफित दाखविण्यात आली. आमदार नाईक यांनी मार्गदर्शन करताना ज्येष्ठ कार्यकर्त्यांबरोबर भावपूर्ण हितगुज साधले. एकेकाळी दोन खासदारांचा पक्ष असलेला भाजप आज दुसर्‍या कार्यकाळात देशामध्ये पूर्ण बहुमताने सत्तेमध्ये आहे. देशातील अर्ध्याहून अधिक राज्यांमध्ये भाजपाची तसेच भाजप व सहयोगी पक्षांची सत्ता आहे. भाजपच्या या नेत्र दीपक यशामध्ये या पक्षाचा पाया मजबूत करणार्‍या आणि पक्ष संघटन बलशाली करण्यासाठी आयुष्यभर कष्ट घेणार्‍या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे योगदान नेहमीच स्मरणार्थ राहील, असे सांगितले. भाजपमध्ये निरपेक्ष वृत्तीने कार्य करणार्‍या कार्यकर्त्यांची आणि मार्गदर्शन करणार्‍या बुद्धिवंतांची फौज असून संघ विचारांचे पाठबळ आहे. पंतप्रधान मोदी यांनी महिला, युवक, ज्येष्ठ, आदिवासी, बहुजन, वंचित देशातील सर्वच घटकांसाठी लोककल्याणकारी योजना यशस्वीपणे राबवून या सर्वांच्या जीवनामध्ये आनंद आणि सुख समाधान निर्माण केलेले आहे. मेळाव्याला उपस्थित काही जेष्ठ कार्यकर्त्यांनी प्रतिनिधिक स्वरूपात आपले मनोगत या वेळी व्यक्त केले. व्ही. टी. पाटील यांनी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली सशक्त भारताची निर्मिती होत असल्याचे मत मांडले. लोकनेते नाईक हे नवी मुंबईच्या विकासाचे शिल्पकार असून आमच्यासारखे जेष्ठ कार्यकर्ते त्याचे साक्षीदार असल्याचे श्री. पाटील म्हणाले. लोकनेते नाईक आणि नवी मुंबई हे समीकरण केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशामध्ये सुपरिचित आहे.
श्रीरंग महाराज बोराडे यांनी लोकनेते नाईक यांच्या विचारानुसार आजही या वयात आमची रात्रंदिवस कार्य करण्याची तयारी असल्याचे स्पष्ट केले.

पंतप्रधान मोदींच्या कणखर नेतृत्वामुळे भारताचा सन्मान
माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक करताना पंतप्रधान मोदी यांच्या कणखर नेतृत्वामुळे जगात भारताचा सन्मान वाढल्याचे नमूद केले. जी ट्वेंटी राष्ट्रसंघाचे अध्यक्ष पद, देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य वर्षात देशाला अर्पण केलेली संसदेची नवीन भव्य-दिव्य वास्तू अशा अनेक अभिमानास्पद बाबी आहेत. पंतप्रधान मोदी यांनी ’सबका साथ; सबका विकास’ धोरणांतर्गत देशातील सर्व घटकांना न्याय दिलेला आहे.

Check Also

पनवेलच्या ग्रामीण भागात भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते विविध कामांचा शुभारंभ

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात विकासाचा धडाका सुरू आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या …

Leave a Reply