पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थ हातांमध्ये आपल्या देशाचे भविष्य सुरक्षित असल्याची जाणीव गेल्या दोन दिवसांत 137 कोटी जनतेला झाली असेल. गेले तीन दिवस दररोज पंतप्रधान संसदेत भाषणासाठी उभे राहात आहेत. जनतेच्या मनातील असंख्य प्रश्नांना सुस्पष्ट उत्तरे देत आहेत. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेचा समारोप करताना पंतप्रधानांनी बुधवारी लोकसभेत विरोधकांच्या आक्षेपांना सडेतोड उत्तरे दिली. किंबहुना, खोट्यानाट्या अफवांच्या साह्याने समाजामध्ये भ्रामक समजुती पसरवून देशाच्या विकासाच्या प्रक्रियेत खीळ घालण्याचे विरोधकांचे उद्योग त्यांनी उघडे पाडले.
दिल्लीच्या सरहद्दीवरील शेतकरी आंदोलनातील खरे आंदोलक कोण आणि आंदोलनजीवी कोण यातील फरक पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात समजावून सांगितल्याने काँग्रेसच्या खासदारांना चांगल्याच मिरच्या झोंबल्या असाव्यात. साहजिकच भाषणात पुढे पंतप्रधान आपले पुरते वाभाडे काढतील हे ओळखून त्यांनी लोकसभेतून सभात्याग करत पळ काढला. अर्थात त्यामुळे पंतप्रधानांची धडाडणारी तोफ काही बंद पडली नाही. नवीन कृषी कायदा कोणावरही सक्ती करणारा नाही किंबहुना तो फक्त एक पर्याय आहे हे पंतप्रधानांनी समजावून सांगितले. ज्याला नवीन कृषी कायद्याचे फायदे नकोसे आहेत, त्याच्यासाठी जुनी व्यवस्था उपलब्ध आहेच. मग आंदोलन कशासाठी, असा सवाल त्यांनी केला. देशातील कृषी उत्पन्न बाजार समित्या किंवा मंड्या, किमान हमी भाव, सरकारी धान्य खरेदी या सर्व प्रचलित गोष्टी जशाच्या तशा राहणार असून नवीन कृषी कायदा केवळ एक पर्याय म्हणून उपलब्ध करून देण्यात आला आहे. ज्याला हवा त्याने तो घ्यावा. परंतु कुठलाही ठोस मुद्दा न मांडता हिंसक आंदोलने करणे हे शेतकर्यांना शोभणारे नाही. शेतकरी आंदोलनाच्या आडून अटकेत असलेल्या नक्षलवाद्यांच्या सुटकेची मागणी करणे तर अजिबातच योग्य नाही असे त्यांनी ठणकावून सांगितले. अजुनही चर्चेचा पर्याय शेतकरी आंदोलकांसाठी खुला आहे असे आवाहन करताना, नव्या कृषी कायद्यामध्ये काही बदल हवा असल्यास तो करण्याची तयारीही त्यांनी दर्शवली. पंतप्रधानांच्या या सडेतोड भाषणानंतर विरोधकांची तोंडे बंद होतील असे नाही. किंबहुना पंतप्रधान मोदींनादेखील याची पुरेपूर जाणीव आहे. न खेलेंगे, न खेलने देंगे, बल्कि खेल बिगाडेंगे – अशा शब्दांत त्यांनी काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांच्या आडमुठ्या भूमिकेचा धिक्कार केला. हे भाषण ऐकल्यानंतर तरी शेतकर्यांनी आपला आंदोलनाचा पवित्रा बदलायला हवा असे वाटते. पंतप्रधान मोदी यांच्यासारखा समर्थ आणि तितकाच संवेदनशील नेता आज देशाला लाभला आहे. देशाचे वर्तमान आणि भविष्य त्यांच्या हातात सुरक्षित आहे एवढे त्यांच्या भाषणावरून स्पष्ट होतेच. विरोधकांचा खरपूस समाचार घेणार्या मोदींचे अतिशय हळवे दर्शन मंगळवारी राज्यसभेत झाले होते. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते व ज्येष्ठ काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांना राज्यसभेने हृद्य निरोप दिला. निरोपाच्या भाषणात जुनी आठवण सांगताना पंतप्रधान मोदींना अश्रू अनावर झाले. आझादांच्या हळव्या आणि समंजस व्यक्तिमत्वाचे त्यांनी दिलेले उदाहरण सार्यांच्याच डोळ्यांच्या कडा ओलावून गेले. देशाचा नेता सामर्थ्यवान असावा आणि तितकाच संवेदनशीलही असावा अशी अपेक्षा असते. परंतु सार्यांच्याच वाट्याला असे नेतृत्व येत नाही. पंतप्रधान मोदींसारखा नेता आपल्याला मिळाला हे भारताचे सौभाग्य आहे.