उपचारांना विलंब; आजार बळावले
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये उपचारांमध्ये झालेला विलंब आणि जीवनशैलीत झालेले बदल यामुळे डोळ्यांच्या समस्यांचे गांभीर्य आणि आजार बळावले आहेत. विशेषतः ज्येष्ठांच्या बाबतीत हा परिणाम अधिक आहे. कोरोनामुळे हॉस्पिटलमध्ये न गेल्यामुळे गेल्या काही महिन्यात मोतीबिंदू पिकल्याच्या प्रकरणांमध्ये पाच पट वाढ झाली आहे, असे डॉ. अगरवाल्स आय हॉस्पिटलचे नेत्रविकारतज्ज्ञ म्हणाले.
अलीकडील काळात डोळ्याच्या गंभीर स्वरुपाच्या समस्या आणि दृष्टी गेलेल्या व्यक्ती नेत्र रुग्णालयांमध्ये येण्याचे प्रमाण वाढले आहे. नवी मुंबईतील डॉ. अगरवाल आय हॉस्पिटलच्या महाराष्ट्रातील विभागीय वैद्यकीय संचालक डॉ. वंदना जैन म्हणाल्या, साथीचा पूर्ण प्रभाव जाणवण्याआधी म्हणजे 2019 या वर्षाच्या शेवटच्या तिमाहीमध्ये मोतिबिंदूची समस्या घेऊन हॉस्पिटलमध्ये येणार्यांपैकी केवळ 10 टक्के व्यक्तींच्या डोळ्यातील मोतिबिंदू पिकलेला असे. 2020 या वर्षाच्या शेवटच्या तीन महिन्यांमध्ये या संख्येत 50 टक्के म्हणजे तब्बल पाच पट वाढ झाली. याचे कारण म्हणजे, हॉस्पिटलमध्ये गेलो तर कोरोनाची लागण होईल, अशी भीती गेले वर्षभर रुग्णांना वाटत होती. ही साथ येण्यापूर्वी अति-पिकलेल्या मोतिबिंदूची समस्या असलेल्या व्यक्ती आढळून आल्या नव्हत्या.
डोळ्यांवरील डिजिटल ताणामुळे डोळे कोरडे होण्याच्या समस्येचे प्रमाण या साथीपूर्वी 10 टक्के होते, ते वाढून आता 30 टक्के झाले आहे. कारण आता वर्क फ्रॉम होम पद्धत वाढीस लागल्यामुळे लोकांना दीर्घकाळ डिजिटल स्क्रीनकडे पाहावे लागत आहे. त्याचप्रमाणे रुग्ण नियमितपणे भेट देत नसल्यामुळे काचबिंदूंची समस्या गंभीर झाल्याचे आम्हाला आढळून आले आहे. मधुमेह असलेल्या अनेक व्यक्तींनी डोळ्यांच्या तपासण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे डोळ्यातील पडद्यामध्ये गुंतागुंत निर्माण झाल्याचेही दिसून आले.