पनवेल :प्रतिनिधी
नवीन पनवेलमधील रस्ते बनवताना सिडकोने टाकलेल्या गतिरोधकावर नियमाप्रमाणे पांढरे पट्टे मारण्यात न आल्याने आणि खणून ठेवलेल्या ठिकाणी रोज अनेक अपघात होत आहेत. त्यामध्ये जखमी होऊन अनेकजण कायमचे जायबंदी होत आहेत. नवीन पनवेल सिडको झोनमध्ये सिडकोने यावर्षी अनेक रस्त्यांची कामे केली. त्यामुळे नागरिकांना चांगल्या रस्त्याचे समाधान मिळाले. काही ठिकाणी लगेच पाइपलाइन टाकण्यासाठी किंवा महावितरणाच्या केबलसाठी पुन्हा रस्ते खोदून ठेवण्यात आले. त्यामुळे वाहतूक कोंडी तर होतेच पण गाड्यांच्या दुरुस्तीवरही खर्च करावा लागत आहे. नवीन पनवेल स्टेशन ते विचुंबा रस्ता तयार केल्यावर चेंबुर बँकेजवळ खणून ठेवण्यात आला. त्याला दोन महिने पूर्ण झाले तरी तो व्यवस्थित करण्यात आला नाही. तेथील खड्ड्यात अनेक गाड्या स्लिप होऊन अपघात होत आहेत. पोदी भागात सेक्टर 16 मध्ये विसपुते हॉस्टेलपासून विचुंबे पुलापर्यंतच्या रस्त्यावर नवीन स्पीड ब्रेकर टाकण्यात आले. त्यावर पांढरे पट्टे न टाकल्याने अनेक दुचाकीस्वार त्यावरून पडून अपघात होत आहेत. सोमवारी दुपारी ही एका स्कूटरवाल्याला स्पीड ब्रेकर न समजल्याने त्याची स्कूटर स्लिप होऊन तो 50 मीटर फरफटत गेला. तो पूर्ण सोलून निघाला होता. अशा प्रकारे रोज एक-दोन अपघात होत असल्यानने सिडकोने नवी ठिकाणी टाकलेल्या स्पीड ब्रेकर पांढरे पट्टे टाकण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
नवीन पनवेलमधील विचुंबे रस्त्यावर नवीन ठिकाणी बसविण्यात आलेल्या गतिरोधकावर पांढरे पट्टे ठेकेदाराकडून मारून घेण्यात येतील. -मेहबूब मुलाणी, कार्यकारी अभियंता, सिडको