Breaking News

अस्थिरतेच्या दिशेने

गेल्या दीड वर्षापासून कसेबसे सत्ता टिकवून असलेले महाविकास आघाडीचे सरकार मुळासकट हादरले आहे याची चिन्हे दिसू लागली आहेत. विख्यात उद्योजक मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानासमोर पार्क केलेल्या स्कॉर्पिओ मोटारीतील स्फोटकांचे प्रकरण, पाठोपाठ घडलेला मनसुख हिरन या स्कॉर्पिओ मालकाचा गूढ मृत्यू आणि या दोन्ही प्रकरणांतील सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांचा कथित सहभाग अशा विपरित घटनांच्या मालिकेमुळे महाविकास आघाडीचे सरकार अत्यंत अडचणीत आले असून लवकरच त्याची परिणती राजकीय भूकंपामध्ये होईल अशी चर्चा आहे.

सचिन वाझे यांना एनआयए या तपास संस्थेने अटक केल्यानंतर राजकीय हालचालींना ऊत आला. वाझे यांचे सहकारी रियाझ काझी आणि अन्य एका पोलिस उपनिरीक्षकालाही एनआयएच्या तपास अधिकार्‍यांनी बोलावून घेऊन कसून चौकशी आरंभली आहे. त्यातच स्कॉर्पिओ सोबत असलेली पांढर्‍या रंगाची इनोव्हा गाडी सचिन वाझे यांच्याच वापरात असल्याचे निष्पन्न झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या संपूर्ण प्रकरणात वाझे यांची कथित भूमिका संशयाच्या घेर्‍यात आहे हे ओघाने आलेच. परंतु त्याहून अधिक बुचकळ्यात टाकणारी बाब म्हणजे वाझे यांची सत्ताधारी शिवसेनेच्या नेत्यांनी चालवलेली वकिली. ही अधिक संशयास्पद बाब वाटते. वास्तविक विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी वाझे यांच्याबाबत विधिमंडळात आवाज उठवून सरकारला धारेवर धरले, तेव्हाच हे प्रकरण सत्ताधारी महाविकास आघाडीला चांगलेच गरम पडणार याची जाणीव महाराष्ट्रातील राजकीय निरीक्षकांना झाली होती. फडणवीस यांनी अँटिलिया-मनसुख हिरन मृत्यू प्रकरण पूर्ण धसाला लावण्याचा चंगच बांधलेला दिसतो. फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाने पहिल्यापासून या संदर्भात आक्रमक चढाईचा पवित्रा घेतला त्यामुळे महाविकास आघाडी सरकार पूर्णत: बॅकफूटवर गेलेले दिसते. आरोपांच्या चक्रव्यूहातून कसे बाहेर पडायचे हा सरकारसमोरचा सर्वात मोठा प्रश्न आहे. कारण याच वाझेंची वकिली करताना शिवसेना नेत्यांनी सगळ्या मर्यादा ओलांडल्या होत्या. वाझे म्हणजे कुणी बिन लादेन आहे का असे उलट सवाल करण्यात शिवसेनेचे नेते मश्गुल होते. वाझे हे एक उत्तम तपास अधिकारी आहेत असे प्रशस्तीपत्र देखील देण्यात आले. प्रकरण एनआयएकडे वर्ग झाल्यानंतर तपासाला कमालीचा वेग आला आणि सचिन वाझे यांच्या विरोधात अनेक गोष्टी उघड होत गेल्या असे दिसते. त्यामुळे हे सारेच प्रकरण शिवसेनेच्या अंगावर शेकले आहे. त्यांना वाचवण्यासाठी महाविकास आघाडीतील अन्य दोन्ही पक्ष फारसे पुढे आलेले नाहीत. किंबहुना, शिवसेना नेत्यांची त्रेधातिरपिट बघण्यात त्यांना जणु आनंदच होत असावा. या सार्‍या प्रकरणात वाझे हा एक छोटासा घटक असून तपासाच्या पुढील भागात खूपच महत्त्वाची माहिती उघड होईल अशी शक्यता विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. फडणवीस यांची माहिती व भाकिते आतापर्यंत तरी सत्य ठरल्याचे परिस्थितीवरून दिसते. ते म्हणतात त्याप्रमाणे पुढील तपासात आणखी बडी नावे बाहेर आली तर त्याचा परिणाम महाविकास आघाडी सरकारच्या अस्तित्वावरच होईल यात शंका नाही. मुळात हे तीन चाकी सरकार दीड वर्ष टिकाव धरू शकले हेच खूप झाले. या प्रकरणाच्या निमित्ताने सत्ताधार्‍यांच्या खुर्च्या डगमगू लागल्या आहेत हे मात्र नक्की.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply