Breaking News

प्लाझ्मा बँकेची सुविधा सुरू करा; नगरसेविका नेत्रा पाटील यांची आयुक्तांकडे मागणी

खारघर ः रामप्रहर वृत्त

पनवेल महानगरपालिका हद्दीत वाढते कोरोना रुग्ण लक्षात घेता प्लाझ्मा बँकेची सुविधा तत्काळ सुरू करण्यात यावी, जेणेकरून कोरोनाबाधित रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे होणारे हाल टळतील व वेळेत त्यांना उपचार मिळतील, अशी मागणी नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी निवेदन दिले आहे. आयुक्तांना दिलेल्या निवेदनात नगरसेविका नेत्रा पाटील यांनी म्हटले आहे की, पनवेल महापालिका हद्दीत पुन्हा दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. कोरोना संसर्गजन्य आजराच्या पार्श्वभूमीवर या आजारात एक चांगली उपचार पद्धती म्हणून प्लाझ्मा थेरपी उपयोगी पडत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मागील वर्षी ही सुविधा पनवेल महापालिकेच्या वतीने एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे उपलब्ध होती. त्यामुळे रुग्णांना अथवा त्यांच्या नातेवाइकांना ही सुविधा सहज उपलब्ध होत होती, मात्र सद्यस्थितीत ही सुविधा उपलब्ध नसल्यामुळे रुग्ण व नातेवाइकांचे हाल होत आहेत. उपचारादरम्यान डॉक्टरांकडून ज्या वेळेस प्लाझ्मा (रक्तद्रव)ची मागणी केली जाते त्या वेळेस रुग्णाच्या नातेवाइकांपुढे मोठा प्रश्न निर्माण होतो व त्यांची धावपळ सुरू होते. ते पाहता अत्यावश्यक सेवा म्हणून प्लाझ्मा बँकेची सुविधा तत्काळ सुरू करण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका पाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply