Breaking News

फणसाड अभयारण्यात कृत्रिम पाणवठे

सध्या वातावरणात मोठा बदल झाला असून, कडक उन्हामुळे भूतलावरील तापमानात मोठी वाढ झाली आहे.त्यातच वणवे लागण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. मार्च अखेर व एप्रिल, मे महिन्यात मुरुड तालुक्याचे तापमान 34 ते 36 डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त राहिल्याने लोक घामाघुम झाले आहेत. अशा कडक उन्हात वन्यजीवांनासुद्धा मुबलक पाणी मिळावे, यासाठी फणसाड अभयारण्य प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत. फणसाड अभयारण्यात पाण्याचे 27 नैसर्गिक स्त्रोत आहेत, शिवाय दोन धरणेसुद्धा आहेत. तरीही अभयारण्य प्रशासनाने 11 बशी आणि 15 वन तलाव मिळून एकूण 26 कृत्रिम पाणवठे तयार केले आहेत. सध्या मुरूड तालुक्याचे तापमान 36 डिग्री सेल्सियस  असून फणसाड अभयारण्यातील पक्षी व वन्यजीव प्राण्यांना पाण्याची टंचाई भासू नये, यासाठी अभयारण्य प्रशासन  प्रयत्नशील आहे. बशी तलाव व वन तलाव या कृत्रीम पाणवठ्यामध्ये पाणी उपलब्ध होण्यासाठी चार बोरिंगसुद्धा मारण्यात आल्या असून, त्याद्वारे या कृत्रीम तलावात पाणी सोडले जात आहे. तसेच अन्य ठिकाणहूनसुद्धा गाडीच्या सहाय्याने पाणी आणले जाते. या कृत्रिम पाणवठ्यांद्वारे   प्राणी व पक्षांची तहान भागवण्याचे उत्तम काम फणसाड अभयारण्य विभागाकडून केले जात आहे. वन्यजीव व पक्षी हे सतत फिरते असतात. ते कधीच एका जागेवर थांबत नाहीत. अशावेळी ते ज्या भागात जास्त फिरतात, तेथे त्यांना पिण्याचे पाणी सहज उपलब्ध व्हावे, यासाठी वन मजूर अभ्यास करून अंदाज घेतात व ज्या ठिकाणी वन्यजीवांचा वावर आहे, त्या ठिकाणी कृत्रीम वन तलाव आणि बशी तलाव बनवले जातात. कडक उन्हामुळे पाण्याची पातळी खाली जाते, अशा वेळी वन्यजीव व पक्षांना पाण्याची टंचाई भासू नये, यासाठी कृत्रीम तलावांची निर्मिती करून अभयारण्यातील कर्मचारी पाण्याचे सातत्याने नियोजन करीत असतात. यासाठी बैलगाडी अथवा टेम्पो च्या सहाय्याने दर तीन दिवसांनी कृत्रीम तलावातील पाणी बदलून वन्यजीवांना सातत्याने चांगले पाणी कसे मिळेल, याकडे कटाक्षाने लक्ष्य पुरविले जात आहे. त्यासाठी फणसाड प्रशासनाने ठिकठिकाणी बोरिंगसुद्धा खणल्या असून, पाणी नियोजनावर भर दिला आहे. वन्यजीवांना पाण्याची टंचाई भासू नये, यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडून विशिष्ठ प्रकारचा निधीसुद्धा पुरविण्यात येत आहे. महाराष्ट्रात 31 अभयारण्य असून, त्यापैकी भीमाशंकर आणि फणसाड अभयारण्यातच मोठी खार (शेकरू)सारखा दुर्मिळ प्राणी पहायला मिळतो. प्रशासनाने याकडे विशेष लक्ष देत विविध सुधारणासुद्धा करण्यास सुरुवार केली आहे. मुरड तालुक्यातील सुपेगाव परिसरात फणसाड अभयारण्याचा विस्तार झालेला असून सुमारे 54 चौरस किलोमीटर क्षेत्रात हे अभयारण्य पसरले आहे. मुरुड, रोहा व अलिबाग तालुक्याच्या सीमा रेषेचाही समावेश यामध्ये होतो. रायगड जिल्ह्यातील किनारपट्टीवर हिरव्यागार झाडाच्या कुशीत वसलेले एक घनदाट जंगल म्हणजे फणसाड अभयारण्य होय. मुंबईपासून 154 किलोमीटर अंतरावरील फणसाड अभयारण्य म्हणजे निसर्गाचे एक वरदान आहे. या अभयारण्यात साग व निलगिरीची उंच अशी भली मोठी झाडे असल्याने कडक उन्हातही दाट सावली या भागात असते. ऐन, किंजल, जांभूळ, हेड, कुडा, गेळ, अंजली, कांचन, सावर त्याचबरोबर सीता अशोक, सर्पगंधा, रानतुळस, कुर्डू, कढीपत्ता, उक्षीसारख्या औषधी वनस्पतीसुद्धा या अभयारण्यात आढळतात. जगातील सर्वात लांब असलेल्या वेलीपैकी एक असलेली गारंबीची वेल या ठिकाणी पहायला मिळते. 90 प्रकारची फुलपाखरे येथे बागडताना दिसतात. त्यामध्ये ब्लू मारगोन, मॅप, कॉमन नवाब अशा वैशीष्ठ्यपूर्ण जातींच्या फुलपाखरांचा समावेश आहे. फणसाड अभयारण्यात सकाळच्या प्रहरी येथे पक्षांची किलबिलाट व विविध वृक्षांवर पक्षांची उपस्थिती पहावयास मिळते. पक्षांच्या 164 प्रजाती या अभयारण्यात आहेत. घुबड, तुरेवाला सर्पगरुड, ससाणा, सफेद पाठीची गिधाडे, सातभाई, बुलबुल, हळद्या तांबट, खंड्या, खाटीक, सुभग, नीलपंख, स्वर्गीय नर्तक, सुतार, महाराष्ट्राचे मानचिन्ह असलेले हरियाल, कोकीळ यासारखे रंगीबेरंगी पक्षी या अभयारण्यात वास्तव्यास आहेत. फणसाड अभयारण्यात रानससा, सांबर, भेकर, पिसोरी, साळींदर, त्रास, रानडुक्कर, मुंगूस, कोल्हा, माकड, रानमांजर, बिबट्या आदी वन्यजीव मोठ्या संख्येने आहेत.पर्यटकांचे व अभ्यासकांचे आकर्षण असलेले शेकरू (मोठी खार) सुद्धा येथे आहे. या अभयारण्यात नुकतेच रान गवेसुद्धा आढळून आले. काशीद, दांडा, सुपेगाव, सर्वे, वडघर परिसरात या रानगव्यांचा वावर दिसून आला आहे. 11रान गवे असल्याची नोंद करण्यात आली आहे. भरपूर खाद्य खाणारा व मोठ्या प्रमाणात पाणी पिणारा हा वन्यजीव आहे. या अभयारण्यात मुबलक पाण्याची सोय झाल्याने गव्यांची संख्या वाढण्यास हरकत नाही. सध्या फणसाडमध्ये येणार्‍या पर्यटकांना विविध सुविधा मिळाव्यात यासाठी विशेष लक्ष पुरविले जात आहे. लहान मुलांसाठी प्ले पार्क, पर्यटकांना राहण्यासाठी तंबू, स्वच्छतागृह, भोजन व्यवस्था अशा अनेक गोष्टीत खर्च करण्यात येत आहे. त्यामुळे फणसाडचे रुपडे बदलून पर्यटकांची संख्या वाढण्यास मदत होणार आहे. फणसाड अभयारण्यात असंख्य पक्षी व वन्यजीव असून, मुबलक  पाण्याची सुविधा करून देण्यात आली आहे. बशी आणि वन तलाव या कृत्रीम पाणवठ्यांवर वन्यजीव सहज तहान भागवू शकतात. वन व बशी तलावात रोज पाणी टाकले जाते. सध्या फणसाडमध्ये पर्यटकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी काम सुरू असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी राजवर्धन भोसले यांनी दिली.

-संजय करडे

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply