आयसीसीचे मोठे पाऊल
दुबई ः वृत्तसंस्था
भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा भारतीय भूमीत क्रिकेटचा थरार रंगण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे वृत्त आहे. भारतात यंदा ट्वेण्टी-20 वर्ल्ड कप होणार आहे आणि त्या संदर्भात पाकिस्तानच्या सहभागावरून उडालेल्या गोंधळावर आयसीसीने मोठे पाऊल उचलले आहे.
भारत-पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना म्हणजे जगातील सर्व चाहत्यांसाठी पर्वणीच. टशन, थरार, वाद असा पूर्ण पॅकेज उभय देशांच्या सामन्यातून अनुभवायला मिळतो, पण दोन्ही देशांमधील राजकीय परिस्थिती पाहता भारत-पाकिस्तान फक्त आयसीसी आणि आशिया चषक स्पर्धेतच
एकमेकांविरुद्ध खेळतात. 2012-13मध्ये भारत दौर्यावर पाकिस्तान मर्यादित षटकांची द्विदेशीय मालिका खेळला होता.
ऑक्टोबर महिन्यात ट्वेण्टी-20 वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे आणि यासाठी पाकिस्तानच्या खेळाडू व सपोर्ट स्टाफला व्हिसा मिळण्यास कोणतीही अडचण येणार नाही, अशी ग्वाही बीसीसीआयने आयसीसीला दिल्याचे समजते.
पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे चेअरमन एहसान मणी यांनी ट्वेण्टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी पाकिस्तानी खेळाडू व सपोर्ट स्टाफला व्हिसा मिळण्याची ग्वाही देण्यात यावी अशी विनंती आयसीसीकडे केली होती. ’भारताने आम्हाला व्हिसाबाबत लेखी आश्वासन द्यावे; अन्यथा वर्ल्ड कप भारतातून यूएईत खेळवण्यात यावा, ’असे मत मणी यांनी व्यक्त केले होते.
पाकिस्तान क्रिकेट संघाला 2016च्या ट्वेण्टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी व्हिसा देण्यात आला होता. त्यानंतर ते भारतात आलेले नाहीत. 2021चा ट्वेण्टी-20 वर्ल्ड कप ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये खेळवण्यात येणार आहे.