माणगावात राजस्थानी माठ दाखल
माणगाव : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसात उन्हाळ्याची तीव्रता वाढत आहे. तापमानाचा पारा 37 अंशपार झाला आहे. वाढणार्या उष्म्याने नागरिक हैराण झाले आहेत. या वाढत्या तापमानावर माडक्यातील गारेगार पाणी हे सर्वसामान्यांना दिलासा देणारे असते.
उन्हाळ्यात सर्वसामान्यांचा फ्रिज म्हणजेच माठ. या माठांना चांगली मागणी असते. ही बाब लक्षात घेऊन प्रतिवर्षी उन्हाळा सुरू झाला की, अनेक विक्रेते माठ विक्रीसाठी घेऊन येतात. या वर्षीही माणगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात राजस्थानी माठ विक्रीसाठी आले असून ग्राहक ते खरेदी करताना दिसत आहेत.
लहान मोठ्या आकारात उपलब्ध असणारे हे माठ 120 ते 220 रुपयांपर्यंत विकले जात आहेत. नळ लावलेल्या माठासाठी 30 ते 50 रुपये जादा द्यावे लागत आहेत. राजस्थानमधून एका वेळेस सुमारे तीन हजार माठ एका गाडीतून आणले जातात. स्थानिक मडक्यांनाही बाजारात चांगली मागणी आहे. मात्र माठ घडविणारे कारागीर दुर्मिळ झाल्याने परराज्यातील माठ खरेदी करण्याशिवाय नागरिकांना पर्याय उपलब्ध नाही. माठ विक्रीसाठी परप्रांतीय व्यापारी मोठ्या प्रमाणात दिसत आहेत.
दरवर्षी उन्हाळ्यात माठ विक्रीसाठी आम्ही येथे येतो. राजस्थानमधून हे माठ आणले आहेत. गेल्यावर्षीपेक्षा या वर्षी किमती वाढल्या नाहीत. नळ असणार्या माठाला चांगली मागणी आहे.
-नंदकिशोर साहा, माठ विक्रेता, माणगाव