Breaking News

विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत दीपिका, अतानूला सुवर्णपदक

ग्वातेमाला सिटी ः वृत्तसंस्था

भारताचे अव्वल तिरंदाज दीपिका कुमारी आणि अतानू दास यांनी सर्वोत्तम कामगिरीचे प्रदर्शन करीत विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदकाची कमाई केली. भारताने तीन सुवर्ण आणि एक कांस्यपदकासह आतापर्यंतच्या विश्वचषक स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली.

गतजागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या दीपिकाने विश्वचषक स्पर्धेतील आपल्या कारकीर्दीतील तिसरे सुवर्णपदक प्राप्त केले. दीपिकाचा पती अतानू याने पुरुषांच्या रिकर्व्ह प्रकाराच्या अंतिम फेरीत बाजी मारत विश्वचषकातील आपले पहिले वैयक्तिक सुवर्णपदक पटकावले. हे दोघेही आता विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेच्या अंतिम टप्प्यासाठी थेट पात्र ठरले आहेत.

तिसर्‍या मानांकित दीपिकाने अंतिम फेरीत अमेरिकेच्या आठव्या मानांकित मॅकेन्झी ब्राऊन हिचा शूट-ऑफमध्ये 6-5 असा पराभव करीत जेतेपद संपादन केले. दीपिकाने उपांत्य फेरीत मेक्सिकोच्या अलेक्जांड्रा व्हॅलेन्सिया हिला 7-3 असे हरवले होते.

भारताने जवळपास दोन वर्षांच्या कालावधीनंतर रिकर्व्ह प्रकारातील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. भारताने या स्पर्धेत दोन वैयक्तिक आणि एक सांघिक सुवर्णपदकाची कमाई केली. दीपिका, कोमालिका बारी आणि अंकिता भगत यांनी भारताला सांघिक सुवर्णपदक मिळवून दिले होते. त्याचबरोबर अतानू आणि अंकिता यांनी मिश्र सांघिक प्रकारात कांस्यपदक पटकावले होते.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply