पनवेल : वार्ताहर
कोरोना महामारीत कापुरला दिवसेगणिक वाढती मागणी पाहता बहुतांश ठिकाणी डुप्लीकेट कापुर विक्रीला उधाण आले असल्याचे बोलले जात आहे.
कोरोना काळात बहुतांश नागरीक आपआपल्या घरांत जंतुसंसर्ग होऊ नये या करीता विविध ठिकाणी कापुराच्या वड्या ठेवत आहेत. तसेच कापुराचा मोठ्या प्रमाणात घरात सायंकाळी अथवा आरती वगैरे असेल किंवा धुपारतीत कापुराच्या वड्यांचा वापर करीत असतात.
कोरोना काळात आपल्या घरांत कापुर ठेवल्याने हवेतील वातावरण शुद्ध होते, असे मानले जाते. याचाच फायदा घेऊन गेल्यावर्षीच्या कोरोना लाटेपासुन बाजारात कापुराची विक्री विक्रमी होत असल्याचे व्यापारी वर्गाचे म्हणणे आहे. सर्वांत शुद्ध व नामवंत कापुर म्हणून भीमसेन कापुर ओळखला जातो. सध्या या कापुराकडे ग्राहकांचा खरेदी करण्याचा कल मोठ्या प्रमाणावर वाढला असल्याचे बोलले जात आहे. भीमसेन कापुराचा बाजार भाव साधारण 1800 रूपये प्रती किलो असा आहे. शुद्ध कापुराची वडी ओळखण्याचे सोपे तंञ म्हणजे ही वडी ग्राहकाने हातात घेतल्यावर ती पुर्ण पारदर्शक साधारण काचेसारखी दिसते, तसेच ह्या कापुराच्या वडीला अत्यंत हलका दाब दिल्यास त्या वडीचा तत्काळ पुर्णता बारीक चुरा होतो.
या कापुराचा सुगंधही चांगला येतो, परंतु बाजारात अनेक कापुर कंपन्यानी डुप्लीकेट स्वस्त कापुर विक्रीकरीता ठेवला आहे. या कापुराच्या वडीला मोठ्या प्रमाणात जोर दिला असता त्या वडीचा भुगा होत नाही, कारण बहुतांश कापुर कंपन्या कापुर वडीत मेणाचा वापर करीत असल्याने तो जाळला असतानादेखील भिमसेन कापुरची सर त्या बाजारातील कापुर वडीला येत नसल्याचे काही सुज्ञ ग्राहकांचे म्हणणे आहे, तरी शासनाने डुप्लीकेट कापुर विक्रीला लगाम लावावा, अशी मागणी ग्राहक वर्गाकडुन केली जात आहे.