खोपोली : प्रतिनिधी : नगरपालिका शिक्षण मंडळाच्या लौजी येथील वासुदेव बळवंत फडके या शाळेत बुधवारी (दि. 17) रात्री भुरट्या चोरांनी हैदोस घातला. चोरट्यांनी प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करीत सर्व वर्गखोल्यांचेही कुलूप तोडले. व सामान अस्ताव्यस्त केले.
शाळेच्या बालवाडी वर्गातील लहान मुलांची खेळणी, तसेच विद्यार्थ्यांसाठी आणलेले गणवेश चोरट्यांनी लंपास केले. पटांगणावर रेषा ओढण्यासाठी वापरण्यात येणारी पांढरी पावडर (फक्की ) सर्वत्र पसरविण्यात आली होती. संगणक कक्षाचे कुलूप तोडलेले आढळले, मात्र संगणक चोरीला गेले नाहीत. यावरून चोरी करणारे भुरटे चोर असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेबाबत मुख्याध्यापिका यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला असून, पुढील तपास सुरू आहे.