Breaking News

कोरोनामुळे बिघडतेय कौटुंबिक स्वास्थ्य

मानसिक तणाव, कलहाने वाढले तंटे; पोलिसांत वादाच्या शेकडो तक्रारी

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

कोरोनामुळे आजारपणाव्यतिरिक्त लॉकडाऊन, आर्थिक अडचणी यांमुळे मानसिक स्वास्थ्यात बदल होत आहे. शुल्लक कारणांवरून लगेच राग येणे, चिडचिड यात वाढ होत आहे. लॉकडाऊन काळात सतत घरात असल्याने घरातल्या व्यक्तींबरोबर अनेक वाद होतात, परिणामी वाद टोकाला जाऊन अनेकांना पोलीस ठाण्यात धाव घ्यावी लागते. यामुळे पोलीस ठाण्यात या वाढत्या कोरोनामुळे लादलेल्या निर्बंधात शेकडो तक्रारी येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

कोरोनामुळे मानसिक स्वास्थ्य बिघडले असताना शुल्लक कारणांवरून कुटुंबातील तंटे वाढू लागले आहेत. नवी मुंबईत चार महिन्यांत पती-पत्नीच्या वादाच्या 339 तक्रारी पोलिसांच्या महिला कक्षाकडे आल्या आहेत. यात सर्वाधिक वाद दोघांमधील अहमपणामुळे पोलिसांपर्यंत येत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षीही 763 तक्रारी आल्या होत्या.

शांतता व सुव्यवस्थेबरोबर पोलिसांना कौटुंबिक वादही मिटवावे लागतात. यासाठी खास महिला कक्षाची स्थापना करण्यात आलेली असते. मात्र अलीकडे महिलांबरोबर पुरुषांच्याही तक्रारींत वाढ होत आहे. त्यात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती व टाळेबंदी यामळे या तक्रारींत वाढ होत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

गेल्या वर्षी पती-पत्नीमधील वादाचे एकूण 763 तक्रार अर्ज झाले होते. याची सरासरी काढली तर महिन्याला 63 तर दिवसाला दोन ते तीन तक्रारी पोलिसांकडे येत होत्या. या वर्षी पहिल्या चार महिन्यांत 339 तक्रारी आल्या आहेत. म्हणजेच महिन्याला 84 तर दिवसाला 8 पेक्षा जास्त तक्रार अर्ज येत आहेत, ही चिंतेची बाब असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

पती-पत्नीतील तंटे पाहता यात दोघांमधील अहमपणा प्रमुख कारणीभूत ठरत असल्याचे दिसत आहे. वाद झाल्यानंतर माघार कोणी घ्यायाची यावर अढून राहिल्याने या तक्रारी पोलिसांकडे येत आहेत. त्याप्रमाणे पतीचे मद्यप्राशन, कुटुंबात सतत भांडणे, अनैतिक संबंधांबाबत संशय, सासू सासर्‍यांची देखभाल, पतीच्या नातेवाईकांकडून टोमणे मारणे, वैयक्तिक स्वातंत्र्य न मिळणे या महिलांच्या तक्रारींची कारणे आहेत तर पतीच्या तक्रारीत या आई-वडिलांची पत्नीकडून काळजी न घेणे, मोबाइलचा अतिवापर, मुलांच्या संगोपनाकडे दुर्लक्ष, अनैतिक संबंधांबाबत संशय या बाबी समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.

नेहमी कायम व्यस्त असलेले पती-पत्नी कोरोना निर्बंधामुळे घरात अडकून पडले आहेत. जास्त वेळ समवेत घलवला जात असल्याने एकमेकांच्या उणिवाही समोर येत आहेत. त्यातून एकमेकांविषयी केलेल्या कल्पनेला छेद जात आहे. त्यातून वदाला सुरुवात होते, मात्र यात दोघेही अडून राहिल्याने या कौटुंबिक तक्रारी पोलिसांपर्यंत येत आहेत. या तक्रारींत आणखी वाढ होऊ  शकते, अशी भीती महिला कक्षाकडून व्यक्त होत आहे. यातील जास्त तक्रारी आम्ही समुपदेशानातून मिटविण्याचा प्रयत्न करत असतो, असे महिला कक्षातील पोलिसांनी सांगितले.

जानेवारी 2020 ते एप्रिल 2020मध्ये कौटुंबिक वादाच्या एकूण 247 अर्ज प्राप्त झाले असून सर्व तक्रारींचे समुपदेशन होऊन समाधान करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यापैकी 68 तक्रारींमध्ये समझोता घडवून आणला. जानेवारी 2021 ते एप्रिल 2021मध्ये 339 तक्रार अर्ज प्राप्त आहेत. त्यापैकी 291 महिलांचे व 49 अर्ज पुरुषांनी केले आहेत.

कौटुंबिक कलह जेव्हा समजुतीच्या पुढे जातो, तेव्हा पोलिसांकडे तक्रार येते. आम्ही समुपदेशनाद्वारेच हा कलह मिटवण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न करतो. मुलांचे भवितव्य महत्त्वाचे असते. दुर्दैवाने गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जास्त तक्रारी आल्या आहेत. बहुतांश प्रकरणात अहंपणा हे कारण असते.

-प्रवीण पाटील, पोलीस उपायुक्त

Check Also

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …

Leave a Reply