Breaking News

श्रीलंका दौर्‍यासाठी द्रविड प्रशिक्षक?

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

भारतीय क्रिकेट संघ जुलै महिन्यामध्ये श्रीलंका दौर्‍यावर जाणार आहे. श्रीलंकेचा हा दौरा भारतीय संघासाठी खास ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. कारण भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड या दौर्‍यामध्ये भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून संघासोबत जाण्याची शक्यता आहे. भारत आणि श्रीलंकेदरम्यान जुलै महिन्यामध्ये तीन एकदिवसीय सामने आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरभ गांगुली याने दिलेल्या माहितीनुसार भारतीय संघ आघाडीच्या खेळाडूंशिवाय जुलैमध्ये श्रीलंकेला जाण्याची शक्यता आहे. कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा यासारखे मोठे खेळाडू श्रीलंका दौर्‍यामध्ये नसतील. इंग्लंडविरोधात होणार्‍या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेची तयारी करण्यासाठी या खेळाडूंना श्रीलंका दौर्‍यातून विश्रांती देण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतलाय. विराट कोहली आणि रोहित शर्माबरोबरच भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्रीसुद्धा या दौर्‍यावर जाणार नाहीयत. ‘क्रिकबज’ने दिलेल्या वृत्तानुसार राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या आपल्या सहकार्‍यांसोबत राहुल द्रविड या श्रीलंका दौर्‍यात भारतीय संघासोबत जाण्याची शक्यत आहे. या संदर्भातील कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. विराट कोहली नेतृत्व करणार्‍या मुख्य संघातील प्रमुख खेळाडू इंग्लंडमध्ये असल्याने श्रीलंका दौर्‍यावर इतर खेळाडूंचा समावेश असणारा संघ पाठवण्यात येईल. त्यामुळेच भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक अरुण यांच्याबरोबरच फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड श्रीलंका दौर्‍यामध्ये भारतीय संघासोबत जाण्याची शक्यता कमीय. मग सपोर्टींग स्टाफ म्हणून राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली भारत अ संघासोबतचे इतर प्रशिक्षक श्रीलंका दौर्‍यावर जाण्याची चिन्हे दिसत आहेत.

युवा खेळाडूंना संधी

राहुल द्रविडने 19 वर्षांखालील संघ आणि भारत अ संघाचे प्रशिक्षकपद भूषविले आहे. त्यामुळे द्रविडसाठी प्रशिक्षक म्हणून संघासोबत जाणे हे फार कठीण ठरणार नाही. ऋषभ पंत आणि पृथ्वी शॉसारखे आज आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकलेले खेळाडू द्रविडच्या प्रशिक्षणाखालीच तयार झालेले आहेत. द्रविडच्या प्रशिक्षणाखाली खेळलेल्या संघांमधून अनेक नवीन खेळाडू भारताच्या मुख्य संघात दमदार कामगिरी करीत आहेत. त्यामुळे या दौर्‍याच्या माध्यमातून मुख्य संघात स्थान पक्के करण्याची संधी नवोदित खेळाडूंना आहे.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply