Breaking News

ज्येष्ठांचे गृहविलगीकरण कमी

महानगरपालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद

नवी मुंबई ः प्रतिनिधी

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावानंतर आता थोडासा का होईना दिलासा मिळत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. परिणामी आता गृहविलगीकरणाचे प्रमाणही निम्म्यावर आले आहे. सद्य:स्थितीमध्ये 1,424 जण घरी उपचार घेत असून, त्यामध्ये पन्नाशीच्या पुढील 337 जणांचा समावेश आहे. मृत्युदर कमी करण्यासाठी 50 वर्षांवरील रुग्णांनी घरी न थांबता रुग्णालयात उपचार घेण्याचे आवाहन केल्यामुळे ज्येष्ठांचे गृहविलगीकरण कमी झाले आहे.

धोकादायक ठरलेली कोरोनाची दुसरी लाट थांबविण्यासाठी महानगरपालिकेने सर्वच ठिकाणी संचारबंदी आणि कडक निर्बंधांच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यास सुरुवात केली आहे. या उपाययोजनांना यश येत असून, दिवसेंदिवस रुग्णसंख्या कमी होऊ लागली आहे. 15 एप्रिलला शहरात 11 हजारांपेक्षा जास्त सक्रिय रुग्ण होते. सद्यस्थितीमध्ये हा आकडा 3,714 झाला आहे.

एप्रिलमध्ये रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे सौम्य लक्षणे असणार्‍यांवर घरामध्येच उपचार करण्यास प्राधान्य देण्यास सुरुवात झाली होती. 28 एप्रिलला शहरात 3,360 जणांवर घरामध्ये उपचार केले जात होते. यामध्ये 50 वर्षांपेक्षा जास्त वय असणार्‍या 933 जणांचा समावेश होता. सद्यस्थितीमध्ये घरात उपचार घेणार्‍यांची संख्या 1,424 झाली असून पन्नासपेक्षा जास्त वय असणार्‍यांची संख्या 337 आहे.

नवी मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी मृत्यूचे प्रमाण चिंताजनक आहे. प्रतिदिन सात ते 10 जणांचा मृत्यू होत आहे. मृत्यू होणार्‍या रुग्णांचे विश्लेषण केल्यानंतर 80 टक्के मृत्यू 50 वर्षांपुढील रुग्णांचे असल्याचे निदर्शनास आले आहे. ज्येष्ठ नागरिकांवर घरामध्ये उपचार सुरू असले व त्यांची ऑक्सिजन पातळी खालावली, तर मृत्यूचा धोका वाढतो. त्यामुळे महानगरपालिकेने पन्नाशीच्या पुढील व्यक्तींनी उपचारासाठी रुग्णालयातच जावे, असे आवाहन केले होते. या आवाहनालाही काही प्रमाणात प्रतिसाद मिळू लागला आहे. 12 दिवसांपूर्वी 60 वर्षांच्या पुढील 306 जण घरी उपचार घेत होते. आता ही संख्या 111 झाली आहे. 50 ते 60 वयोगटातील 627 जण घरी उपचार घेत होते. आता हे प्रमाण 226वर आले आहे.

पन्नास वर्षांवरील कोरोना रुग्णांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल व्हावे यासाठी महानगरपालिकेने खासगी डॉक्टर व लोकप्रतिनिधींचीही मदत घेण्यास सुरुवात केली आहे. मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी मागील रविवारी 300 खासगी डॉक्टरांशी संवाद साधला होता. सोमवारी पुन्हा 96 नामांकित फिजिशियनशी संवाद साधला. मृत्युदर कमी करण्यासाठी 50 वर्षांवरील व सहव्याधी असणार्‍या रुग्णांनी घरी थांबू नये. या सर्वांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ज्येष्ठ नागरिक घरी थांबले व त्यांची ऑक्सिजन पातळी कमी झाली तर मृत्यूचा धोका वाढतो. यामुळे त्यांना योग्य मार्गदर्शन करणे आवश्यक असून यासाठी खासगी डॉक्टरांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Check Also

उरणमधील ‘उबाठा’, शेकापचे कार्यकर्ते भाजपमध्ये

आमदार महेश बालदी यांच्याकडून स्वागत उरण : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना उद्धव बाळासाहेब …

Leave a Reply