उरण : प्रतिनिधी
कोविडदरम्यान हजारो रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी अत्यावश्यक असलेला 28.72 मेट्रिक टन मेडिकल ग्रेड ऑक्सिजन मंगळवारी जेएनपीटीत उतरविण्यात आला आहे. हा प्राणवायू संयुक्त अरब अमिरातीच्या जेबेल अलीमधुन आयात करण्यात आला आहे. मागील 15 दिवसांत एमव्ही जीएसएफ जिसली, एमव्ही नागोया टॉवर, एमव्ही बीएसएल लियास्सोल या तीन मालवाहू जहाजांतून 258.95 मेट्रिक टन मेडिकल ग्रेड ऑक्सिजन जेएनपीटी बंदरात उतरविण्यात आले आहे. त्यानंतर हा ऑक्सिजन साठा देशभरात वितरीत करण्यात आला.
जलवाहिनीतील क्रॉजेनिक कंटेनरमध्ये भरलेल्या मेडिकल ग्रेड ऑक्सिजनची कोविड रुग्णांच्या उपचारासाठी अत्यावश्यक बाब ठरत चालली आहे. मेडिकल ग्रेड ऑक्सिजनअभावी देशभरात शेकडो रुग्णांना प्राण गमवावे लागले आहे. त्यामुळे बंदरात आयात करण्यात आलेल्या मेडिकल ग्रेड ऑक्सिजनचा साठा बंदरातुन तात्काळ इच्छित स्थळी पोहचवण्यासाठी जेएनपीटीकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत.
देशभरातील कोविड रुग्णांसाठी संयुक्त अरब अमिरातीमधुन मागील 15 दिवसांत 258.95 मेट्रिक टन मेडिकल ग्रेड ऑक्सिजनचा साठा उतरविण्यात आला असल्याची माहिती जेएनपीटीच्या अधिकृत सुत्रांनी दिली आहे.