पेण : प्रतिनिधी
राज्यातील शिंदे, फडणवीस सरकारने दिवाळीचे औचित्य साधत अवघ्या 100 रुपयांत रेशनवर धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. पेण तालुक्यातील सुमारे 41 हजार 500 रेशन कार्डधारकांना त्याचा लाभ होणार आहे. पात्र शिधापत्रिकाधारकांना आगामी दिवाळीनिमित्त एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर व एक लिटर पामतेल या चार शिधाजिन्नसांचे किट वितरित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून पेण तालुक्यामध्ये 41 हजार 406 शिधापत्रिकाधारकांना लाभ मिळणार आहे. चार शिधाजिन्नसांचा संच अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटूंब तसेच एपीएल (केशरी) शेतकरी योजनेतील पात्र शिधापत्रिकाधारकांना प्रती शिधापत्रिका ई-पॉस प्रणालीद्वारे प्रती संच शंभर रुपये या सवलतीच्या दराने वितरित करण्यात येणार आहे. याचा सर्व पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन नायब तहसीलदार तथा तालुका पुरवठा अधिकारी सुरेश थळे यांनी केले आहे.