पोलादपूर : प्रतिनिधी
तौक्ते चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्तांना त्वरित मदत मिळवून देण्याबाबतच्या सूचना विधानसभेचे विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी (दि. 20) येथे संबंधीत अधिकार्यांना दिल्या. तौक्ते चक्रीवादळात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरीता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर कोकण दौर्यावर आहेत. गुरुवारी सकाळी त्यांनी पोलादपूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहामध्ये शासकिय अधिकार्यांसोबत चर्चा केली. या वेळी फडणवीस यांनी तौक्ते चक्रीवादळात झालेल्या नुकसानीची माहिती घेतली व गतवर्षी झालेल्या निसर्ग वादळातील बाधितांना आतापर्यंत किती मदत वाटप झाली, अशी विचारणा करताच महाडच्या प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी सुमारे 90 टक्के मदतीचे वाटप झाल्याची माहिती दिली. ज्यांचे बँक खाते नंबर प्राप्त झाले नाहीत, अशांच्या बँक खात्यामध्ये मदतीची रक्कम जमा झाली नसल्याचे पोलादपूर तहसीलदार दिप्ती देसाई यांनी या वेळी सांगितले. लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या काही उद्योग, सेवा आणि संगणक शिक्षण संस्थांचे कर्ज अथवा व्याज माफीसंदर्भात निर्णय होण्यासाठी पदाधिकार्यांकडून फडणवीस यांना या वेळी निवेदन देण्यात आले. रायगड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार रवींद्र चव्हाण, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज भागवत, जिल्हा सरचिटणीस बिपीन महामूणकर, जिल्हा कार्यकारणी सदस्य राजू धुमाळ, संदीप ठोंबरे, तालुका अध्यक्ष प्रसन्ना पालांडे, तालुका सरचिटणीस पंकज बुटाला, शहर अध्यक्ष राजा दीक्षित, महिला मोर्चा शहर अध्यक्ष उज्ज्वला तथा माई शेठ, युवा मोर्चा रायगड जिल्हा चिटणीस महेश निकम, शहर अध्यक्ष जयेश जगताप, विकास लाड, भाई जगताप, नामदेव शिंदे, मनोज मोरे, माजी जि.प. सदस्य अनिल नलावडे, एकनाथ कासुर्डे, माजी नगरसेवक प्रदीप पवार, नितीन बोरकर, संतोष कासार, मंगेश शिंदे, अनू पटेल, कलिका अधिकारी, विजया कासार, जान्हवी तलाठी, माई शिंदे, तनुजा भागवत, अर्चना शेठ यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच महाड उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश तांबे, महावितरणचे सूद, राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाच्या डिव्हीजनल इंजिनियर आकांक्षा मेश्राम, तालुका कृषी अधिकारी कैलास धुमाळ, नायब तहसीलदार शरद आठमुठे, समीर देसाई, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर रत्नागिरीकडे मार्गस्थ झाले.