पेण : प्रतिनिधी
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी (दि. 20) पेणमध्ये भेट देऊन तौक्ते चक्रीवादळात झालेल्या नुकसानीची पाहणी केली. या वेळी त्यांनी विनोबा भावे यांचे स्मारक असलेल्या गागोदे बुद्रुक या गावातील नुकसानीचा आढावा घेतला व पाहणी केली. तसेच चक्रीवादामध्ये मयत झालेल्या रामा बाबू कातकरी या इसमाच्या पत्नीची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. कोकणात वादळीवार्यासह पाऊसही झाला अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली, झाडे उन्मळून पडली, तर काही ठिकाणी घरांवरील पत्रे आणि छप्परही उडाले चक्रीवादळामुळे झालेल्या विविध घटनांमध्ये अनेकांचा मृत्यू झाला तर शेकडो घरे उद्ध्वस्त झाली आहेत. तौक्ते चक्रीवादळात नुकसान झालेल्या पेण तालुक्यातील एक हजार घरांचे पंचनामे सुरू असून लवकरच त्यांना राज्य सरकारने नुकसान भरपाई देण्याची गरज आहे, असे रामदास आठवले यांनी या वेळी सांगितले. आरपीआयचे रायगड जिल्हा अध्यक्ष जगदीश गायकवाड, पेण तहसीलदार अरुणा जाधव यांच्यासह प्रशासकीय अधिकारी व कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.