वर्धा : प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (दि. 1) वर्ध्यातील प्रचारसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर जोरदार तोफ डागली. पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहणारे आता निवडणूक लढवण्यासच नकार देत आहेत, कारण त्यांना माहीत आहे हवेची दिशा कोणत्या दिशेला आहे, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी पवार यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला. पवारांवर टीका करताना, ‘शरद पवार यांच्या पुतण्याच्या हातूनच त्यांची हिट विकेट गेली’ असा जोरदार टोलाही मोदी यांनी लगावला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आता खूप मोठे कौटुंबिक युद्ध सुरू झाले आहे. शरद पवार यांची पक्षावरील पकड आता सुटत चालली आहे. आता हळूहळू पवार यांचा पुतण्या पक्ष आपल्या ताब्यात घेऊ पाहात आहे, असे अजित पवार यांचे नाव न घेता पंतप्रधान मोदी म्हणाले. कौटुंबिक युद्धामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उमेदवारांना तिकिटे देण्यातही अडथळे आले. कोणाला कुठली जागा द्यावी, कुठून लढावे हा मोठा प्रश्न पवारांपुढे उभा राहिला. यामुळे पक्षातील इतर नेत्यांचे धैर्य समाप्त झाल्याचेही मोदींनी सांगितले.
पवारांवर चौफेर टीका करताना पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, शरद पवार हे देशात सर्वात अनुभवी नेत्यांपैकी एक समजले जातात. ते जे काही बोलतात, जे काही करतात, ते-ते विचारपूर्वक करीत असतात. अशा शरद पवार यांनी या वेळी निवडणुकीची हवा कोणत्या दिशेला वाहतेय हे लक्षात आल्याने ते मैदान सोडून पळाले.
शरद पवार हे शेतकरी कुटुंबातील असूनदेखील ते शेतकर्यांना पूर्णपणे विसरले आहेत. त्यांचे शेतकर्यांवर जराही लक्ष नाही. शेतकर्यांना न्याय द्यायचा सोडून याच पवार कुटुंबाने शेतकर्यांवर थेट गोळ्या चालवण्याचे आदेश दिले, असा गंभीर आरोपही पंतप्रधान मोदी यांनी आपल्या घणाघाती भाषणातून केला.
या सभेमध्ये पंतप्रधान मोदींनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेसने हिंदू दहशतवाद हा शब्द वापरून देशाचा अपमान केला आहे. हिंदू दहशतवादी कृत्यामध्ये सहभागी असण्याची जगामध्ये एकही घटना नाहीय. हिंदू दहशतवाद हा शब्द आणून काँग्रेसने पाच हजार वर्षांपेक्षा जुनी संस्कृती बदनाम करण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही मोदींनी केला.
या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित होते.