Breaking News

खोपोलीतील ताकई रस्त्याचे काँक्रीटीकरण संथगतीने

आरपीआयचा आंदोलनाचा इशारा

खोपोली : प्रतिनिधी

नगर परिषद हद्दीतील ताकई रस्त्याच्या कामाचे  घोंगडं अनेक वर्षापासून भिजत पडलेले असतानाच  मोठा गाजावाजा करून सुरू केलेल्या काँक्रीटीकरणाचे काम कासवगतीने सुरु आहे. काम करण्यासाठी खोदण्यात आलेल्या रस्त्यावरून जाताना वाहनचाकांना मोठी कसरत करावी लागत आहे. दोन महिन्यात काम पूर्ण होणे अपेक्षित असताना ठेकेदाराने अनेक ठिकाणी खड्डे खोदून ठेवल्याने अपघाताची भीती वाढली आहे. या रस्त्याचे काम तात्काळ मार्गी लागले नाही तर आंदोलन करण्याचा इशारा आरपीआयचे जिल्हा युवक अध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी दिला आहे.

खोपोली नगरपालिकेच्या हद्दीतील ताकई रस्ता नेहमीच चर्चेत राहिला आहे. गेली अनेक वर्ष या रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमधून नागरिकांना प्रवास करावा लागत आहे. ताकई गावाच्या पुढे मोठी औद्योगिक वसाहत असल्याने या रस्त्यावर अवजड वाहनांची वर्दळ असते. प्रचंड खड्ड्यांमुळे या मार्गावर अनेक अपघात झाले आहेत. एमएमआरडीएने या रस्त्यासाठी चार कोटी 80 लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. स्थानिक आमदारांच्या उपस्थितीत मोठा गाजावाजा करून रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. मात्र दोन महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतरही रस्त्याच्या कामाने गती घेतलेली नाही. नगरपालिका आणि ठेकेदारामध्ये समन्वय नसल्याने हे काम संथगतीने सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.

सिमेंटचा रस्ता आणि त्याच्या दोन्ही बाजूला गटार असे या कामाचे स्वरूप आहे. या कामाचे भूमिपूजन करण्यापुर्वी रस्त्याच्या कडेला असलेली झाडे, रस्त्याच्या मधून गेलेल्या वेगवेगळ्या वाहिन्या, रस्त्याला अडथळा ठरणारे विजेचे पोल हटवण्याची तसेच स्थानिक शेतकर्‍यांना विश्वासात घेवून जागा संपादीत करण्याची गरज असताना घाईघाईत भूमिपूजन करून ठेकेदाराला काम करण्यास सांगण्यात आले. ठेकेदाराला आवश्यक सहकार्य नगरपालिकेकडून मिळालेले नसल्याने या रस्त्याचे काम रखडले आहे. नगरपालिकेने सर्व अडथळे दूर करून दिले तर वेळेत काम पूर्ण करून देऊ अशी ग्वाही ठेकेदार मंदार पाटील यांनी दिली आहे. मात्र अनेक अडथळे असल्याने पावसाळ्या पुर्वी या रस्त्याचे काम होण्याच्या आशा मावळल्या आहेत.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply