Breaking News

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार

महाराष्ट्रातून चौघांना संधी; एकूण 43 जणांना मंत्रिपदे

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार बुधवारी (दि. 7) झाला. राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये झालेल्या सोहळ्यात एकूण 43 मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ देण्यात आली. यात महाराष्ट्रातील नारायण राणे, कपिल पाटील, भारती पवार व भागवत कराड या चार जणांचा समावेश आहे. या सोहळ्यास राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह प्रमुख मंत्री उपस्थित होते.
15 कॅबिनेट मंत्री आणि 28 राज्यमंत्री
नारायण राणे, सर्बानंद सोनोवाल, डॉ. वीरेंद्र कुमार, ज्योतिरादित्य शिंदे, रामचंद्र प्रसाद सिंह, अश्विनी वैष्णव, पशुपती कुमार पारस, किरेन रिजिजू, राजकुमार सिंह, हरदीप सिंग पुरी, मनसुख मांडविया, भूपेंद्र यादव, पुरुषोत्तम रुपाला, किशन रेड्डी, अनुरागसिंह ठाकूर, पंकज चौधरी, अनुप्रिया पटेल, सत्यपालसिंह बघेल, राजीव चंद्रशेखर, शोभा करंदलजे, भानूप्रतापसिंह वर्मा, दर्शना विक्रम जार्दोस, मीनाक्षी लेखी, अन्नपूर्णा देवी, ए. नारायणस्वामी, कौशल किशोरे, अजय भट्ट, बी. एल. वर्मा, अजय कुमार, चौहान दिव्यांशू, भगवंत खुंबा, कपिल पाटील, प्रतिमा भौमिक, सुभाष सरकार, भागवत कराड, राजकुमार रंजन सिंह, भारती पवार, बिश्वेश्वर तूडू, शंतनूू ठाकूर,
डॉ. मंजुपारा महेंद्रभाई, जॉन बर्ला, एल. मुरगन, नितीश प्रामाणिक.
नारायण राणेंचा थक्क करणारा प्रवास
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात स्थान पटकावणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी अनेक चढउतार पाहत आपला दबदबा कायम राखला आहे. शिवसेनेत त्यांनी विविध पदे भूषविली. 2005मध्ये त्यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करून काँग्रेसची कास धरली, मात्र तिथे त्यांचे पटले नाही. अखेर त्यांनी काँग्रेसलाही राम राम ठोकला. भाजपने त्यांना राज्यसभेवर घेतले आणि आता केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिले आहे.
कपिल पाटील ः सरपंच ते केंद्रीय मंत्री
कपिल पाटील यांनी भिवंडीतील दिवेअंजूर गावचे सरपंच म्हणून राजकीय करकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर पं. स., जि. प. सदस्य म्हणून छाप पाडली. पुढे जि. प. अध्यक्षपदासह जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्षपदही भूषवले. सन 2014मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि सलग दोनदा खासदार म्हणून दणदणीत विजय मिळविला. त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे.
डॉ. भारती पवार सुशिक्षित चेहरा
डॉ. भारती पवार यांच्या रूपात यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर नाशिकला पहिल्यांदाच केंद्रात मंत्रिपद मिळणार आहे. पवार याआधी राष्ट्रवादीमध्ये होत्या. त्यांनी 2019मध्ये भाजपत प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने शिवसेनेचा उमेदवार आयात केल्याने पवार नाराज होत्या. स्वत:ची यंत्रणा आणि आता भाजपची ताकद मिळाल्याने त्यांनी राष्ट्रवादीच्या धनराज महालेंचा पराभव केला.
शेतकरीपुत्र डॉ. भागवत कराड
शेतकरी कुटुंबातून येणार्‍या डॉ. भागवत कराड यांनी वैद्यकीय शिक्षण घेतले आहे. कराड हे औरंगाबाद महापालिकेत तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले. यादरम्यान त्यांनी स्थायी समिती सदस्य, उपमहापौर, महापौर अशी जबाबदारी सांभाळली. कराड हे ओबीसी समाजाचे नेते म्हणूनही ओळखले जातात. मराठवाड्यात भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी काम केले आहे. 

Check Also

सीकेटी विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त दिंडी

लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन …

Leave a Reply