अलिबाग ः प्रतिनिधी
अलिबाग आणि वरसोली समुद्र किनार्यांवर विनाकारण फिरणार्या नागरिकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. रविवारी (दि. 6) पोलिसांनी जवळपास 90 जणांवर दंडात्मक कारवाई केली. या वेळी त्यांच्याकडून 25 हजार रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला. अलिबाग तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा एकदा वाढण्यास सुरुवात झाली आहे. दररोज सरासरी दीडशे नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. तालुक्यात 1 हजार 193 उपचाराधीन रुग्ण आहेत. तालुक्यात आतापर्यंत 400 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर एकूण कोरोनाबाधितांची संख्या 13 हजार 878वर पोहचली आहे. त्यामुळे कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन करणार्यांविरोधात पोलिसांनी आता कारवाईला सुरुवात केली आहे. सुरुवातीला विनाकारण रस्त्यावर फिरणार्यांची कोरोना चाचणी करण्यावर पोलिसांनी भर दिला. आता समुद्र किनार्यांवर फिरणार्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून समुद्रकिनाऱे पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहेत, मात्र तरीही रविवारी मोठ्या संख्येने पर्यटक आणि स्थानिक अलिबाग आणि वरसोली येथे दाखल झाले होते. अखेर अलिबाग पोलिसांनी हस्तक्षेप करीत या सर्वांवर दंडात्मक कारवाई केली. 90 जणांकडून जवळपास 25 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्यात प्रामुख्याने तरुण मुलामुलींचा समावेश आहे. विनाकारण रस्त्यावर आणि समुद्र किनार्यांवर फिरू नका. नियमांचे पालन करा, असे आवाहन पोलिसांनी या वेळी केले.