Breaking News

कॅपिटॉल; सव्वाशे वर्षांच्या या इमारतीत चित्रपटाच्या पडद्याला 97 वर्ष

चित्रपटसृष्टी, चित्रपटगृह, चित्रपटरसिक आणि विविध माध्यमांतून (मुद्रित माध्यम, उपग्रह वाहिन्या, डिजिटल माध्यम) होत असलेला चित्रपटासंदर्भातील प्रवास इस्टमनकलर असाच! कुठे आठवणींचा फ्लॅशबॅक, कुठे गीत संगीताचा मनसोक्त मनमुराद आस्वाद, कुठे सेलिब्रिटीजच्या (पूर्वी त्यांना कलाकार म्हणत हे पटतयं ना?) गॉसिप्स, ग्लॅमर, गप्पा गोष्टींचे आकर्षण. आणि यात एक भारी महत्त्वाचा फंडा चित्रपटगृहांचा! प्रेक्षकांपर्यंत चित्रपट कसा पोहचत आला हा एक वेगळाच प्रवास. आज तो मोबाईल, ओटीटीपर्यंत पोहचलाय. शहरांपासून ग्रामीण भागापर्यंत चित्रपट पोहचतोय आणि त्यात काळानुसार बदल होताहेत. यात संदर्भ, माहिती, तपशील, गोष्टी, आठवणी, किस्से भरपूर.
असेच एक चित्रपटगृह कॅपिटॉल. मुंबईतील अतिशय मोक्याच्या ठिकाणचे. एखाद्या चित्रपटगृहातील जवळपास प्रत्येक शनिवारी दुपारी 3 व सायंकाळी 6चा शो हमखास हाऊसफुल्ल व्हायचाच असे मी तुम्हाला अगदी सुरुवातीलाच सांगितले तर तुमचे दोन प्रश्न असतील, असे वेगळेच वैशिष्ट्य असलेले चित्रपटगृह कोणते आणि हमखासपणे शनिवारी हाऊसफुल्ल गर्दी का होत असे?
असे चित्रपटगृह होते, हे कॅपिटॉल. रसिकांच्या किमान दोन पिढ्यांतील चित्रपट रसिकांसमोर एव्हाना हे थिएटर डोळ्यासमोर आले असेलच. दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या (पूर्वीचे नाव व्हिक्टोरिया टर्मिनल. अर्थात व्ही.टी.) बरोबर समोर हे थिएटर आजही आहे, पण आता तेथील खेळ बंद होऊन काही वर्षे झाल्याने ती सव्वाशेपेक्षा जास्त वय वर्षाची इमारत निस्तेजपणे उभी आहे इतकेच. शांत असली तरी ती लक्ष वेधते. तेथून जाताना क्षणभर वाटते, तेथील पडद्यावर एकादा चित्रपट सुरू असावा आणि त्यातील एकादी डायलॉगबाजी, एखादे गाणे चक्क बाहेर वडापावचा आस्वाद घेताना ऐकू येते असा आजही मला भास होता… चित्रपटगृहाचं चित्रपटाचा इतिहास घडवतात, चित्रपट रसिक निर्माण करतात..
मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीसमोर कॅपिटॉल चित्रपटगृहाची इमारत आहे असेही म्हणता येईल. अतिशय जुन्या म्हणजेच इंग्रजकालीन मुंबईची ओळख असलेली ही वास्तू लक्षवेधक आहे. आपल्या देशात चित्रपट माध्यम व व्यवसाय रूजत असताना मुंबईत एकेक करत नवीन चित्रपटगृह जन्माला आले त्यातील हे एक. अधिक तपशील मिळवता असता समजले की ही मजबूत इमारत 1879 साली बांधण्यात आली. ही हेरिटेज वास्तू आहे. कुनवरजी पघटीवाला यांनी ती त्या काळानुसार व्हिक्टोरियन कल्चरची ठेवण अशी ही वास्तू उभारली आणि शनिवार व रविवारी येथे एखाद्या मराठी, गुजराती अथवा इंग्लिश नाटकाचा प्रयोग होत असे आणि ते तेवढे पुरेसेही असे. (त्या काळातील अनेक चित्रपटगृहे मुळात नाटकांची होती.)
काही वर्षांनी म्हणजे 28 जानेवारी 1928 रोजी रंगमंचाचे रूपांतर चित्रपटगृहात केले. अर्थात, आता ’पडदा’ आला आणि देश विदेशातील मूकपट येथे प्रदर्शित होऊ लागले. यालाच तब्बल 97 वर्ष पूर्ण झालीदेखील. 1929 साली सिधवा कुटुंबाने कॅपिटल थिएटर विकत घेतले. काही वर्षातच ’आपल्या देशात चित्रपट बोलू लागला’… 1931 साली अर्देशीर इराणी दिग्दर्शित ’आलम आरा’ हा पहिला हिंदी बोलपट आणि 1932 साली चित्रपती व्ही. शांताराम दिग्दर्शित ’अयोध्येचा राजा’ हा पहिला मराठी बोलपट रूपेरी पडद्यावर आला. चित्रपट निर्मितीत हळूहळू वाढ होत होती. जनसामान्यांपर्यंत चित्रपट पोहचवायचा तर चित्रपटगृह हवीत ही स्वाभाविक भावना होतीच. आणि शंभर वर्षांपूर्वीची मुंबई ही जेमतेम सायन वांद्रे येथपर्यंतचीच होती आणि त्यात कसलीही दाटीवाटी नव्हतीच. सरळ, शांत आयुष्य होते. इंग्रजकालीन दक्षिण मुंबई हा शहर रचना अभ्यासक्रमाचा आणि इतिहासाचा सखोल वेध घेण्याचा वेगळाच विषय आहे आणि त्यात ही त्या काळातील चित्रपटगृह. ती वास्तू अनेक दृष्टीने महत्त्वाची.
कॅपिटॉल हे अगदीच मोक्याच्या ठिकाणी. जवळच एम्पायर होते. (कालांतराने ते न्यू एम्पायर झाले, तेही बंद झालेय. तीही इमारत आज शांत उभी आहे.) तुलनेत स्टर्लिंग खूपच उशिरा म्हणजे आजच्या काळाचा विचार करता छप्पन वर्षांपूर्वी ते सुरू झाले. न्यू एक्सलसियर हे पूर्वीचे
एक्सलसियर. अगदी फार पूर्वी त्याचे नाव नॉव्हेल्टी होते. एकंदरीत ’सिनेमा थिएटर पार्क’ म्हणावा असाच स्पॉट. त्यात स्टर्लिग अनेक वर्ष इंग्लिश चित्रपटांचे हुकमी होते.
कॅपिटॉलला सुरुवातीला सातत्याने इंग्लिश चित्रपट प्रदर्शित होत. मग हिंदी चित्रपट प्रदर्शित होऊ लागले. कधी एखाद्या आठवड्यात
एखादा दक्षिण भारतीय प्रादेशिक भाषेतील चित्रपट प्रदर्शित होई. (एकदा ’हर नाईट्स’ या चित्रपटाच्या पोस्टरवरुन वादही झाला.) कधी कधी रविवार सकाळी 9 वाजता असाच एखादा साऊथ इंडियन चित्रपट असे आणि मुंबईतील अनेक दक्षिण भारतीय चित्रपट रसिक हमखास गर्दी करीत. यानिमित्त त्यांच्या एकमेकांशी गाठीभेटी होत.
कॅपिटॉलची चित्रपट प्रदर्शित होण्याची प्रथा वेगळीच. खरंतर हा रविवार व सुट्टीचा दिवस वगळता कायमच प्रचंड रहदारीचा, गजबजलेला, गर्दीचा विभाग. याचे कारण अर्थातच पूर्वापार येथे अनेक प्रकारची अक्षरशः असंख्य लहान मोठी सरकारी आणि खाजगी  कार्यालये. येथे नागरी वस्तीही आहे. तात्पर्य, कॅपिटॉलला लोकप्रिय चित्रपटाला लॉन्ग रनला म्हणजे रौप्यमहोत्सवी यशाला पूरक वातावरण, पण तरीही येथे असंख्य नवीन चित्रपट एक अथवा दोन आठवड्यांसाठी प्रदर्शित होत. मधूनच त्या दिवसातील एकादा सुपर हिट चित्रपट एक आठवड्यासाठी पुन्हा येई.
मी मीडियात आल्यावर या गोष्टीचा शोध घेतल्यावर समजले, अगदी सुरुवातीपासूनच चित्रपट वितरकांनी कॅपिटलकडे ’शॉर्ट टर्म चित्रपटगृह’ म्हणूनच पाहिले. कुलाबा, बोरीबंदर परिसरातील डिफेन्स, स्ट्रॅन्ड, कॅपिटल, रेक्स ही थिएटर्स मेन थिएटरला
सपोर्ट सिस्टीम मानली गेली. म्हणजेच नाझ परिसरातील थिएटरमध्ये प्रदर्शित होत असलेला चित्रपट येथेही प्रदर्शित केला जाऊ लागला आणि मग वर्षांनुवर्ष तेच सुरू राहिले. चित्रपट इतिहासातील हीदेखील महत्वाची गोष्ट.
मी गिरगावात राहत असल्याने मला कॅपिटॉल अनेकदा फळले. नाझ, ड्रीमलॅन्ड, नॉव्हेल्टी, मिनर्व्हा इत्यादीत अनेक सुपर हिट चित्रपटांची तिकीटे आगाऊ तिकीट खिडकीवरही मिळणे दिव्य असे. त्यासाठी लांबलचक रांगेत उभे रहावे लागे, पण कॅपिटॉलला मधल्या वारी लवकर गेल्यावर तिकीट मिळण्याची हमी असे. तीच तर महत्त्वाची गंगा थिएटरला ’दोस्ताना ’साठी जाण्यापेक्षा कॅपिटॉल बरे पडे. सत्तरच्या दशकात गिरगावातून  61, 65, 66, 69, 126 या क्रमांकापैकी कोणतीही बस पकडून दहा पैसे तिकीटात कॅपिटॉलला जाता येई. पिक्चर संपल्यावर चालत यायलाही काहीच वाटत नसे. सुहाग, वो मै नही, घर, धरम करम, सबसे बडा रुपय्या वगैरे अनेक चित्रपट कॅपिटॉलला असेच पाहिले. नाझला एन्जॉय केलेला ’यादों की बारात’मध्येच एक आठवड्यासाठी कॅपिटॉलला लागला तेव्हा पुन्हा एन्जॉय केला. आवडलेला चित्रपट पुन्हा पुन्हा पाहण्याचे ते युग होते.
मीडियात आल्यावर कॅपिटॉलला जाणे कमी होत गेले तरी प्रेस शोला आवडलेले असे ’दिल’, ’हत्यार’ पुन्हा याच कॅपिटॉलला पाहिले. कॅपिटॉलला समोरच्या बाजूने करंट बुकिंगची खिडकी आणि इमारतीच्या डाव्या बाजूस आगाऊ तिकीट खिडकी, पण तिकीट काढताना अप्पर स्टॉलचे अगदी शेवटच्या दोन रांगेतील तिकीट नकोसे वाटे, कारण बाल्कनीच्या बरोबर खालीच ते असल्याने भले मोठे खांब दुर्लक्षित करुन पडद्यावर लक्ष केंद्रित करावे लागे. तोही अडथळा पब्लिकने सहन केला आणि पडद्यावर लक्ष केंद्रित केले.
दक्षिण मुंबईतील अनेक कार्यालये पूर्वी शनिवारी अर्धा दिवस असत आणि अगदी वसई, विरार, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई असे सगळीकडचे नागरिक वर्षानुवर्ष या परिसरात नोकरी आणि मिटींगसाठी येताहेत. अनेकांना शनिवारी अर्धा दिवस ऑफिस सुटताच कॅपिटॉलला पिक्चर पाहून समोरच लोकल ट्रेन पकडून घरी जायला सवयीचे झाले होते. एकाच फेरीत दोन कामे होत. या विभागात एखाद्या ऑफिस मिटींगसाठी आल्यावर येथेच एकादा चित्रपट पाहणारे फिल्म दीवाने खूप होते. दक्षिण मुंबईत अनेक कॉलेज असल्याने तोही क्राऊड कॅपिटॉलला लाभे. महाविद्यालयीन युवक युवतींच्या गर्दीने अनेक चित्रपटगृहांचे तरुणपण कायम राहिले.
पिक्चरच्या मध्यंतरला कॅपिटॉल थिएटरला लागूनच आराम वडापाव होताच. आजही आहेच. हुकमी गरमागरम. आजही तो आहेच म्हणा आणि पिक्चर संपल्यावर उजव्या बाजूच्या इराणी हॉटेलमध्ये कटींग चहा आणि ब्रून मस्कासह त्याच पिक्चरवर भरपेट चर्चा. ते दिवसच वेगळे होते. हा इराणी काही वर्षांपूर्वी बंद झाला. कॅपिटॉलही बंद झाले. शांत झाले. या परिसरात गेल्यावर हमखास ते नजरेत पडते आणि जुने पिक्चर आठवतात. अधूनमधून याच कॅपिटॉलमध्ये ’पिक्चरचे शूटिंग’ झालेय. फराह खान दिग्दर्शित ’ओम शांती ओम’मधील थिएटर हेच आहे. शाहरूख खान, दीपिका पदुकोण यांच्यावरील काही दृश्ये येथेच चित्रीत झालीत. वेंकी अटनुरी दिग्दर्शित लकी भास्कर या चित्रपटातीलही काही दृश्य याच कॅपिटॉलमध्ये चित्रीत झालीत.
यामुळे सिनेमाच्या पडद्यावर कॅपिटॉल राहिलयं, पण प्रत्यक्ष कॅपिटॉलमधील शो केव्हाच संपलाय. जुन्या पिढीतील चित्रपट रसिकांची चित्रपटगृहाशीही बांधिलकी होती. भावनिक ओढ होती. म्हणूनच एकेक करत जुनी सिंगल स्क्रीन थिएटर्स अर्थात एकपडदा चित्रपटगृहे बंद होत गेल्याने अनेक फिल्म दीवाने हळहळतात. चित्रपटगृह म्हणजे केवळ चार भिंती नसतात तर ते अनेक प्रकारच्या छोट्या छोट्या गोष्टींचे विश्व असते. अनुभव असतो. पडद्यावर चित्रपट सुरू असतो, प्रेक्षक आपापल्या आवडीनुसार तो त्याच पडद्याशी एकरूप झालेला असतो… टाळ्या, शिट्या, हशा याने तो दाद देतो.
जुन्या एकपडदा चित्रपटगृह अर्थात सिंगल स्क्रीन थिएटर्सना आपले एक व्यक्तिमत्व असे. त्या चित्रपटगृहाचे नाव घेताच वा आठवताच डेकोरेशनसह त्या चित्रपटगृहाची इमारत डोळ्यासमोर येणारच, कारण तेथे फक्त चित्रपट पाहिले असे नव्हे तर त्या चित्रपटगृहाशी एकरूप होऊन ते पाहिले. त्यातील जे आवडले ते डोक्यात ठेवलेत आणि जे आवडले नाहीत ते पडद्यावर ठेवले. मुंबईतील जुन्या काळातील चित्रपटगृहांचा इतिहास माहितीपटाच्या रूपात जतन करण्याची आवश्यकता आहे. चित्रपट इतिहासातील हे एक महत्त्वाचे देणे आहे.
आजही कॅपिटॉलवरून जाताना पटकन जुन्या काळात मी जातोच. माझ्या पिढीतील अनेक चित्रपट रसिकांचेही अगदी हेच होत असेल. आमच्या पिढीला वाचन, चित्रपट, नाटक व भरभरून गप्पा करणे या गोष्टी जगण्याचा एक भाग होता… आज कॅपिटॉल चित्रपटगृहात चित्रपट दाखवत असते, तर त्याला 97 वर्ष पूर्ण झाली असती यानिमित्त हा फोकस.

  • दिलीप ठाकूर (चित्रपट समीक्षक)

Check Also

भिंगारी संघाने जिंकला नमो क्रिकेट चषक

पनवेल : रामप्रहर वृत्तनमो चषक 2025 अंतर्गत खारघर येथे झालेल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत भिंगारी …

Leave a Reply