Breaking News

एकही झोपडपट्टीधारक बेघर होणार नाही; आम्ही तुमच्या ठामपणे पाठीशी!

आमदार प्रशांत ठाकूर यांची बैठकीत ग्वाही

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल एसटी बसस्थानक ते रेल्वे स्टेशन परिसरातील झोपडपट्टी परिसरात विकास आराखड्यामुळे निर्माण झालेल्या संभ्रमाबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्पष्टता दिली आणि झोपडपट्टीधारकांना दिशाभूल करणार्‍यांपासून सावध राहण्याचा सल्ला दिला. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत सर्वेक्षण सुरू असल्यामुळे पुनर्वसन निश्चित होईल आणि एकही झोपडपट्टीधारक बेघर होणार नाही, असे त्यांनी आश्वासित करून झोपडपट्टीवासीयांना मोठा दिलासा दिला आहे.
विकास आराखडा आणि त्या अनुषंगाने शिवाजीनगर, मालधक्का, पंचशील नगर, नवनाथ नगर या झोपडपट्टी ारकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न समाजकंटकांकडून केला जात आहे. त्यामुळे येथील झोपडपट्टीधारकांनी आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट घेऊन या विषयावर योग्य मार्ग काढण्याची मागणी केली. त्यानुसार ही बैठक मार्केट यार्ड येथे पार पडली. या बैठकीस पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, उपाध्यक्ष जयंत पगडे, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ, अजय बहिरा, तेजस कांडपिळे, माजी नगरसेविका सुशीला घरत, वृषाली वाघमारे तसेच मच्छिंद्र झगडे, अशोक आंबेकर, सामाजिक कार्यकर्त्या जरीना शेख, रावसाहेब खरात, राहुल वाहुळकर, संजय जाधव, चंद्रकांत मंजुळे व्यासपीठावर उपस्थित होते. या बैठकीस झोपडपट्टीधारक बंधू-भगिनी मोठ्या संख्यने उपस्थित होते.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी बोलताना सांगितले की, झोपडपट्टीधारकांनी दिशाभूल व फसवणूक करणार्‍यांपासून सावध रहावे. पनवेलमधील शिवाजीनगर, मालधक्का, पंचशील नगर, नवनाथ नगर आदी झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून होणार असून सर्व झोपडपट्टीधारकांना पक्की घरी देण्यात येणार आहेत. पनवेल महापालिकेत अंतर्गत येणार्‍या या झोपडपट्टीचे पुनर्वसन सरकारच्या माध्यमातून करण्याची जबाबदारी पनवेल महापालिकेची असून या झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनसाठी पंतप्रधान आवास योजनेंतर्गत सर्वेक्षणदेखील सुरू आहे. ज्या ज्या ठिकाणी पाठपुरावा करावा लागेल त्या ठिकाणी आम्ही पाठपुरावा करू असे सांगून कोणताही झोपडपट्टीधारक बेघर होणार नाही याची काळजी घेऊ, त्यांना परवडेल अशी घरे शासनाच्या नियमातून व माध्यमातून देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले.
झोपडपट्टी पुनर्वसन प्रक्रियेच्या अनुषंगाने कार्यवाही सुरू असताना फॉर्म भरण्यासाठी काही लोकांकडून झोपडीधारकांकडून पैसे मागितले जात आहेत. त्यामुळे गरीब माणसाकडून का पैसे घेता, असा सवालही त्यांनी उपस्थित करून झोपडपट्टीवासीयांची दिशाभूल करणार्‍यांचा खरपूस समाचारही घेतला. झोपडपट्टीवासीयांना चांगली आणि पक्की घरे मिळाली पाहिजेत हा आमचा कायम आग्रह राहिला आहे आणि त्यानुसार तशी मागणी आणि पाठपुरावा आम्ही केला आहे. प्रत्येक झोपडपट्टीवासीयाला घर मिळाले पाहिजे यासाठी पनवेल महापालिकेची जबाबदारी आहे. व्यासपीठावरील भाजपचे आम्ही सर्व सक्षम आहोत आणि तशी जबाबदारी आम्ही घेतलेली आहे, असे सांगतानाच फसवणूक करणार्‍यांपासून सावध रहा, असे आवाहनही आमदार प्रशांत ठाकूर यांनी करत फसवणूक करणार्‍याला आम्ही भाजपमध्ये घेणार नाही, असेही अधोरेखित केले.
झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनासाठी पालिका आयुक्तांची भेट घेऊ. गरज भासल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री व संबंधित अधिकार्‍यांना भेटून हा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन देत तुम्हाला सर्वांना न्याय भेटेल आणि जोपर्यंत पुनर्वसनाच्या बाबतीत न्याय मिळत नाही तो झोपडपट्टीवासीयांच्या एकाही घराला हात लावू देणार नाही, असा विश्वास देत भाजप तुमच्या पाठीशी काल होता, आज आहे आणि उद्याही राहील, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी आश्वासित करत नागरिकांमधील संभ्रावस्था दूर केली. या बैठकीमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त करून आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजपच्या पदाधिकार्‍यांना धन्यवाद दिले.

Check Also

वावंजे, मानपाडा येथे विकासकामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघातील वावंजे निताळे आणि मानपाडा कातकरी वाडी येथे मंगळवारी (दि.28) …

Leave a Reply