Breaking News

सुधागडातील आदिवासींचे भाजीचे मळे उद्ध्वस्त, नुकसानभरपाईची मागणी

पाली : प्रतिनिधी

सुधागड तालुक्यातील आदिवासी बांधव नदीकिनारी जागा शोधून तेथे भाजीपाल्याचे मळे करून आपली उपजीविका करीत आहेत. त्यांनी फुलविलेल्या मळ्यांचे तौत्के चक्रीवादळात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी बाधीत आदिवासी बांधव करीत आहेत. सुधागड तालुक्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी, कातकरी बांधव असून, ते काही ठिकाणी भाडेतत्वावर जमीन घेवून दुधी, वांगी, टोमॅटो, कारली, भेंडी, काकडी व इतर भाज्यांचे मळे करतात. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव, लॉकडाऊन पाठोपाठ आलेल्या तौत्के चक्रीवादळाने त्यांनी फुलविलेले मळे उद्ध्वस्त झाले आहेत. मात्र मळे केलेली जमीन त्यांच्या मालकीची नसल्याने नुकसानीचे पंचनामे होऊ शकले नाहीत. मोठ्या आशेने आम्ही भाजी मळा लागवडीसाठी गुंतवणूक केली, मात्र तौत्के चक्रीवादळ व अतिवृष्टीने आमच्या पिकाची नासाडी झाली. थोड्या फार प्रमाणात उत्पादन झाले मात्र लॉकडाऊनमुळे ग्राहक मिळणे कठीण झाले. त्यामुळे लागवडीसाठी केलेला खर्चदेखील निघाला नाही. जमीन मालकीची नसल्याने नुकसानीचे पंचनामे करण्यात अडचणी येत आहेत. त्यासाठी प्रशासनाने मदत करावी. राज्य शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी मळे व्यवसायिक हरी देवराम वाघ यांनी केली.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply