कळंबोलीत पोस्टर, सॅनिटायझर, मास्कचे वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त
जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला असून, लाखो रुग्णांना बाधा झाली आहे. यातील काहींचा मृत्यूदेखील झाला आहे. त्यामुळे या महाभयंकर आजारापासून बचावासाठी सार्वजनिक ठिकाणी जनजागृती करण्यात येत आहे. याच अनुषंगाने कळंबोलीतील भाजप नगरसेवक राजेंद्र शर्मा यांनी पुढाकार घेत पोलीस ठाणे, वाहतूक शाखा, तसेच शाळा आणि अंगणवाड्यांत माहिती पोस्टर, सॅनिटायझर आणि मास्कचे शुक्रवारी (दि. 13) वाटप केले.
कोरोनासंदर्भात शासकीय पातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू झाल्या असल्या तरी याबाबत अद्याप अनेकांना नीट माहिती नाही. हा रोग किती महाभयंकर आहे? त्याचबरोबर त्याची लक्षणे काय आहेत? त्यावर उपचार आहेत की नाहीत? यासारख्या अनेक गोष्टींपासून कित्येक जण दूर आहेत. याशिवाय या रोगाची लागण होऊ नये याकरिता काय खबरदारी घेतली पाहिजे याविषयीही अनेक लोक अनभिज्ञ आहेत. या पार्श्वभूमीवर कोरोनाबाबत जनजागृती आणि प्रबोधन करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक राजेंद्र शर्मा यांनी उपक्रम राबविला.
कळंबोली प्रभाग समिती कार्यालय, कळंबोली, रोडपाली व खिडूकपाडा जिल्हा परिषद शाळा, अंगणवाड्या, पोलीस ठाणे, तसेच वाहतूक शाखा येथे कोरोनाबद्दल माहिती देणारी पोस्टर, सॅनिटायझर आणि मास्कचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात भाजप कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, सरचिटणीस राजेंद्र बनकर, प्रशांत रणवरे, ज्येष्ठ कार्यकर्ते प्रकाश शेलार, कमल कोठारी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. घाबरू नका, पण काळजी घ्या, असे आवाहन या वेळी भाजपकडून करण्यात आले.