प्रवीण दरेकरांचे मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र
मुंबई ः प्रतिनिधी
मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले आंदोलन मुख्यमंत्र्यांना आदळआपट वाटते. मुख्यमंत्र्यांना संघर्ष नको असेल, तर त्यांनी संवादातून मार्ग काढावा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मराठा आरक्षणाबाबत वेळकाढूपणाचे राजकारण करीत असल्याची टीका भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी रविवारी (दि. 27) मुंबईत शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या बाइक रॅलीत ते बोलत होते.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठीच्या या रॅलीत भाजपचे विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड सहभागी झाले होते. या वेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले. आताचा संघर्ष ही तर केवळ ठिणगी आहे. त्याचे वणव्यात कधी रूपांतर होईल ते कळणारही नाही, असा इशाराही भाजपचे विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या वेळी राज्य सरकारला दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येत्या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा विषय निकाली काढावा, या मागणीसाठी रविवारी मुंबईत शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली बाइक रॅली काढण्यात आली होती.
मराठा समाजाच्या भावनांचा विचार करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येत्या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा विषय निकाली काढावा, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा अध्यादेश काढून ते आरक्षण न्यायालयात टिकवले. मराठा आरक्षणाचा कायदा करून तोदेखील त्यांनी उच्च न्यायालयात टिकवला, मात्र महाविकास आघाडी सरकारला सर्वोच्च न्यायालयात हे आरक्षण टिकवता आले नाही, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली.
दरम्यान, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मागणीसाठीही भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. शनिवारी राज्यभरात भाजप नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकार्यांकडून चक्का जाम आंदोलन करण्यात आले होते. पुणे, मुंबई, सातारा, कोल्हापूर, नागपूर, नाशिक अशा महत्त्वाच्या शहरांत तसेच तालुक्याच्या ठिकाणी ओबीसी आरक्षण परत मिळावे यासाठी भाजपने एल्गार केला. भाजपचे देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत राज्यातील विविध ठिकाणी हे आंदोलन पार पडले.
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचेही आरक्षण गेले
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसींचेही स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण गेले. त्यामुळे ओबीसींवर मोठा अन्याय झाला आहे. ओबीसींना पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांत आरक्षण मिळवून देण्यासाठी मी केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. गेल्या काही दिवासांपासून मराठा आरक्षण व ओबीसींचे राजकीय आरक्षण या मुद्द्यांवरून राज्यातील राजकारण ढवळून निघताना पाहायला मिळत आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या विषयावरून भाजपने राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन केले आहे.