Breaking News

महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळेच आरक्षण गेले

नागपूर ः प्रतिनिधी
मराठा आरक्षणापाठोपाठ राज्यात ओबीसी आरक्षणाचा मुद्दा ज्वलंत बनला आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने विरोधी पक्ष भाजपने आक्रमक भूमिका घेतली असून, शनिवारी (दि. 26) राज्यभरात चक्का जाम आंदोलन केले.  नागपुरात विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनात सहभागी होत महाविकास आघाडी सरकारवर आरक्षणाच्या मुद्द्यावरून हल्लाबोल केला. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच आरक्षण गेले, असा आरोप त्यांनी या वेळी केला.
आंदोलनात बोलताना फडणवीस यांनी ठाकरे सरकारचा समाचार घेतला. ते म्हणाले, भाजपचे हजारो कार्यकर्ते ओबीसींच्या हक्कांकरिता रस्त्यावर उतरले आहेत. माझा विश्वास आहे की एकतर सरकारला ओबीसींचे आरक्षण पुन्हा द्यावे लागेल, नाहीतर खुर्ची खाली करावी लागेल. बावनकुळे म्हणतात ते खरंय. हे आरक्षण राजकीय षड्यंत्रामुळे गेले आणि हे किती नाटकबाज आहेत. कालपासून नवीन सूर सुरू झाला. मोदीजींनी डेटा दिला नाही. मी राज्यात सत्तेत असलेल्या पक्षांच्या नेत्यांना खुले चॅलेंज देतो. कुठल्या आधारावर
सर्वोच्च न्यायालयाने हे आरक्षण द्यायला सांगितले आहे तो जनगणनेचा डेटा नाही, तर इम्पिरिकल डेटा आहे आणि तो राज्य मागासवर्ग आयोगाला जमा करायचा आहे, पण या सरकारचे एक मस्त आहे. यांचे एकमेकांशी पटत नाही, मात्र एका गोष्टीवर यांचा एक सूर आहे. बाकी एकमेकांचे लचके तोडायला ते तयार आहेत.
सत्तेचे लचके तोडताना जिथे हे पडले, धडपडले, अपयशी ठरले, नापास झाले तिथे एका सुरात बोलतात मोदींनी केले पाहिजे, मोदींनी केले पाहिजे. मला तर असे वाटते की एखाद्या दिवशी यांच्या बायकोने यांना मारले तर त्यालाही हे मोदींनाच जबाबदार ठरवतील. अशा प्रकारची ही परिस्थिती आहे, असा टोला फडणवीस यांनी लगावला. सगळ्या घटकांना जमीनदोस्त करायचे आणि मोदींमुळे झाले, मोदींनी केले, असे बोलायचे, पण ये पब्लिक है, ये सब जानती है. या जनतेला माहिती आहे कुणी काय केले. या देशात 70 वर्षांनंतर देशाचे पंतप्रधान ओबीसींचा पुत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले, त्या दिवशी पहिल्यांदा संविधानात ओबीसींना जागा मिळाली. काँग्रेस, राष्ट्रवादीने हे नाही दिले. ओबीसीला या संविधानात आयोगाला जागा मिळाली आणि ओबीसीला संविधानिक करण्याचे काम जर कुणी केले असेल, तर ते नरेंद्र मोदींनी केले, असेही या वेळी फडणवीस यांनी नमूद केले.
स्वतः काही करायचे नाही. आपल्या नाकर्तेपणामुळे राज्य सरकारने मराठा आरक्षण घालवले, ओबीसी आरक्षण घालवले, पदोन्नतीतील आरक्षण घालवले, असा आरोप करून पुढच्या तीन-चार महिन्यांत आपण ओबीसींचे आरक्षण परत आणू शकतो. खर्‍या अर्थाने आमच्या हाती जर सूत्रे दिली तर मी दाव्याने सांगतो, ओबीसींचे राजकीय आरक्षण परत आणू आणि नाही आणू शकलो, तर राजकीय संन्यास घेईन, असेदेखील फडणवीस या वेळी म्हणाले.
सरकारचे प्रतिज्ञापत्र नव्हे, ओबीसी आरक्षणाचे मृत्युपत्र ः आशिष शेलार
मुंबई ः ओबीसी आरक्षणासाठी मुंबईतील मुलुंड चेकनाक्याजवळ भाजप आमदार आशिष शेलार यांनी कार्यकर्त्यांसोबत चक्का जाम आंदोलन केले. या वेळी बोलताना त्यांनी सर्वोच्च न्यायालयात ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द होणे हे ठाकरे सरकारचे पाप आहे. या सरकारला ओबीसींना राजकीय आरक्षण द्यायचेच नाही हे पुन्हा एकदा सिद्ध होतंय. कोर्टामध्ये ज्या पद्धतीने राज्य सरकारने प्रतिज्ञापत्र दिले आहे, ते एका अर्थाने ओबीसींच्या आरक्षणाचे मृत्युपत्रच आहे, अशा शेलक्या शब्दांत आशिष शेलार यांनी समाचार घेतला.
आंदोलनादरम्यान आशिष शेलार म्हणाले की, हे राजकीय आरक्षण परत मिळवणे ही भाजपची घोषणा आहे. त्यासाठी आम्ही कोणत्याही थरापर्यंत जाऊ आणि आरक्षण मिळवून देऊ. पुढे बोलताना त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचे आंदोलन म्हणजे चोराच्या उलट्या बोंबाच आहेत. या नौटंकीला जनता ओळखते, असे म्हटले.
जनता तुम्हाला दारातही उभे करणार नाही -पंकजा मुंडे
पुणे ः ओबीसींना राजकीय आरक्षण पुन्हा मिळावे, या मागणीसाठी पुण्यातील भाजपच्या आंदोलनात बोलताना माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारवर परखड शब्दांमध्ये टीका केली. 50 टक्क्यांच्या वरची लढाई सुरू असताना 50 टक्क्यांखालचे आरक्षणही सरकारने गमावले. या सरकारला लाज वाटली पाहिजे. चुकून तुम्ही राजकारणात आलात. भविष्यात जनता तुम्हाला दारातदेखील उभे करणार नाही, असे त्या म्हणाल्या.
या वेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी काँग्रेसच्या आंदोलनावरही टीका केली. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर आम्ही चक्का जाम जाहीर केला, तर सरकारी पक्षदेखील आंदोलनाची भाषा करायला लागले. मंत्री असताना आंदोलनाची भाषा करणे तुम्हाला शोभते का? मंत्र्यांनी निर्णय करायचे आहेत. आंदोलन करण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो हे तुमच्या नाकर्तेपणामुळे झाले आहे, असेही त्यांनी फटकारले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply