ज्या भागत दळण-वळणाच्या सुविधा चांगल्या आहेत तेथील विकास वेगाने होतो. रायगड हा झपाट्याने औद्योगिक विकास होत असलेला जिल्हा आहे, परंतु रायगड जिल्ह्यात रस्ते चांगले नसल्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला म्हणावी तशी गती मिळालेली नव्हती. आता रायगड जिल्ह्यातील रस्ते विकासाला केंद्र सरकारने गती दिली आहे. जिल्ह्यात दहा हजार कोटींच्या रस्त्यांची कामे सध्या प्रगती पथावर आहे. या अंतर्गत 13 प्रमुख रस्त्यांचा विकास केला जात आहे.
रायगड जिल्ह्यात पूर्वी 154 किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग होते. यात 348 किलोमीटर लांबीच्या नवीन मार्गांचा समावेश करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यात भविष्यात रस्त्यांचे जाळे निर्माण होणार आहे. त्यामुळे आगामी काळात रायगडच्या विकासलादेखील गती
मिळणार आहे.
केंद्र सरकारने सध्या देशातील रस्ते विकासाची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यातदेखील रस्त्यांची कामे वेगाने होत आहेत. त्याला रायगड जिल्हादेखील याला अपवाद ठरलेला नाही. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यात रस्ते विकासाचे अनेक प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत.
रायगड जिल्ह्यात आता 503 किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग झाले आहेत. यात पेण ते खोपोली, महाड ते रायगड किल्ला, वडखळ ते अलिबाग, दिघी ते माणगाव, इंदापूर ते माणगाव, पाली खोपोली आणि पुणे ताम्हाणी घाटमार्गे माणगाव रस्त्याचा समावेश आहे. नवी मुंबई प्रस्तावित विमानतळाला जोडणार्या प्रमुख रस्त्यांची कामेही जोमाने सुरू आहेत. जेएनपीएला जोडणार्या रस्त्यांचाही विस्तार करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रस्त्यांचे जाळे आणखी विस्तारत आहे.
बहुप्रतिक्षीत रेवस -रेड्डी सागरी राष्ट्रीय महामार्गाच्या कामांना गती मिळाली आहे. रेवस ते रेड्डी सागरी मार्गासाठी नऊ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. एमएसआरडीसीच्या माध्यमातून हा रस्ता केला जाणार असून रस्त्याच्या सुधारीत आराखड्यालाही मंजुरी देण्यात आली आहे. या मार्गावारील रेवस -करंजा पूल गेली अनेक वर्षे रखडला आहे. आता राज्य सरकारच्या माध्यमातून 850 कोटींच्या रेवस -करंजा पुलाची निविदा मागविण्यात आली आहे.
याशिवाय दृतगती महामार्गाच्या धर्तीवर मुंबई ते गोवा ग्रिनफिल्ड एक्सप्रेस महामार्ग उभारण्याचे राज्यसरकारने निश्चित केले आहे. या महामार्गामुळे नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून काही तासांत गोव्याला पोहोचता येणार आहे. अलिबाग विरार मल्टिमॉडेल कॉरिडोरसाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या कानउघणनंतर आता मुंबई- गोवा महामार्गाचे पळस्पे ते इंदापूर आणि इंदापूर ते कशेडी महामार्गाचे चौपदरीकरणाच्या कामाने वेग घेतला आहे. यातील पळस्पे ते इंदापूर या रखडलेल्या कामाला गती देण्याचा प्रयत्न केला जात आहे. या टप्प्याचेदेखील काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्याला अनुमती दिली आहे. इंदापूर ते कशेडी मार्गातील वीर ते भोगाव आणि भोगाव ते खवटी मार्गातील कामे येत्या काही महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित आहे.
इंदापूर ते वडपाले टप्प्यातील काम काही अडचणीमुळे रेंगाळले आहे. या अडचणीदेखील दूर होणार आहेत. त्यामुळे गेली 12 वर्षे रखडलेल्या मुंबई -गोवा महामार्गाच्या चौपदीकरणाचे काम पूर्ण होईल, या मार्गावरील वाहतुकीचा वेग वाढेल.
राज्यातील औद्योगिक जिल्हा अशी रायगडची ओळख आहे. अनेक मोठमोठाले प्रकल्प या जिल्ह्यात येत आहेत. रायगड जिल्ह्यात भविष्यात मोठ्या प्रमणावर गुंतवणूक केली जाणार आहे. पनवेल येथे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ होत आहे. रायगड जिल्ह्यात केवळ औद्योगिक प्रगती होते असे नाही तर या जिल्ह्यात पर्यटन विकासालादेखील वाव आहे.
पूर्वी मुंबई -गोवा व मुंबई- पुणे हेच दोन महामार्ग रायगड जिल्ह्यातून जात होते. मुंबई – पुणे दु्रतगती महामार्ग आल्यामुळे उत्तर रायगडातील गुंतवणूक वाढली. कोकणात जाण्यासाठी केवळ मुंबई -गोवा महामार्ग हाच एकवेम पर्याय होता. आता या महामार्गाचे चौपदीकरण होत आहे. शिवय त्याला पर्याय म्हणून रेवस -रेड्डी सागरी महामार्ग व त्यामुळे सर्व रस्ते विकासाचीही सर्व कामे लवकर मार्गी लागली तर विकासाला चालना मिळणार आहे. मुंबई ते गोवा ग्रिनफिल्ड एक्सप्रेस महामार्ग उभारण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यात महामार्गांचे जाळेच तयार होणार आहे.
रायगड जिल्हा सागरी मार्गाने जोडला गेला आहे. या जिल्ह्यातून रेल्वे जाते. आत या जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ होत आहे. त्याबरोबर रस्त्यांचे जाळेदेखील तयार केले जात आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्याच्या विकासालादेखील वेग येणार आहे.
महामार्ग किंमत कामाची सद्यस्थिती
- दिघी माणगाव 457 कोटी 94.28 टक्के पूर्ण
- आगरदांडा इंदापूर 355 कोटी 94. 63 टक्के पूर्ण
- पुणे हद्द ते माणगाव 223 कोटी 98.00 टक्के पूर्ण
- वाकण पाली खोपोली 376 कोटी 86.53 टक्के पूर्ण
- पाटगाव खोपोली 119 कोटी 90.88 टक्के पूर्ण
- पेण खोपोली 301 कोटी 62.76 टक्के पूर्ण
मुंबई-गोवा महामार्ग सद्यस्थिती
पनवेल ते इंदापूर – 84 किमी – 942 कोटी – नवीन कंत्राटदार कार्यवाही सुरू
इंदापूर ते वडपाले – 26 किमी – 1202 कोटी – 35 टक्के पूर्ण
वीर ते भोगाव खूर्द – 38.78 किमी – 1598 कोटी – 79.90 टक्के पूर्ण
भोगाव ते खावटी – 8.9 किमी – 743 कोटी – 76.90 टक्के पूर्ण
-प्रकाश सोनवडेकर, खबरबात