Breaking News

इगतपुरीत रेव्ह पार्टीचा धांगडधिंगा

22 जण ताब्यात; सिनेसृष्टीतील चार महिलाही सहभागी

नाशिक ः प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे रविवारी (दि. 27) पहाटेच्या सुमारास नाशिक ग्रामीण पोलिसांनी एका हाय प्रोफाइल रेव्ह पार्टीवर धाड टाकली. मुंबई-आग्रा महामार्गावरील मानस रिसॉर्टमधील स्काय ताज व्हिलातील दोन बंगल्यांत रेव्ह पार्टीचा धांगडधिंगा सुरू होता. या धाडीत ड्रग्ज व हुक्का सेवन करताना 22 जणांना रंगेहाथ पकडण्यात आले.
यातील काही पुरुष व महिला मादक पदार्थांचे सेवन करीत बीभत्स अवस्थेत आढळल्या. या रेव्ह पार्टीत चित्रपट व मनोरंजन क्षेत्रात काम करणार्‍या चार महिलाही सहभागी झाल्याचे कारवाईनंतर स्पष्ट झाले. तसेच ‘बिग बॉस’ रिअ‍ॅलिटी शोमध्ये भाग घेतलेल्या एका महिलेचाही समावेश आहे. 10 पुरुष व 12 महिलांसह एकूण 22 जणांना नाशिक ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले. फिल्म इंडस्ट्रीतील दोन कोरिओग्राफरचाही अटक केलेल्यांत समावेश आहे.
इगतपुरीत मानस रिसॉर्टच्या हद्दीतील स्काय ताज व्हिला बंगल्यावर छापा टाकण्यात आला होता. रविवारी पहाटेच्या सुमारास नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी टीमसोबत ही धाड टाकली. या वेळी पोलिसांनी ड्रग्ज व रोकडही जप्त केली असून अटक केलेल्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात येत आहे. पोलिसांनी येथून ट्रायपॉड, कॅमेरा व मादक पदार्थ जप्त केले. सर्व आरोपींना ताब्यात घेऊन कोरोना नियमांचे उल्लंघन, अवैधरीत्या पार्टी, अशा कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वेश्याव्यवसायाच्या अंगानेही घटनेचा तपास केला जात आहे.

Check Also

पनवेलच्या झोपडपट्टी पुनर्वसनासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांचा पाठपुरावा

मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा आणि त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न …

Leave a Reply