नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
नवी मुंबईत कोरोना रुग्णसंख्या कमी होताच निर्बंध शिथिल करण्यात आले. त्यामुळे काही नागरिकांच्या बेफिकिरीमुळे कोरोनाबाधितांचा आलेख पुन्हा चढणीला लागला आहे. फेब्रुवारी ते मे या तीन महिन्यांत उच्चांकी पातळीवर गेलेला रुग्णवाढीचा आलेख जूनच्या पहिल्या आठवड्यात खाली आल्यानंतर नंतरच्या तीन आठवड्यांत तो वाढत आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात तर दैनंदिन रुग्णसंख्या शंभरच्या वर गेल्याने चिंता व्यक्त होत आहे. पंधरा लाखांची लोकसंख्या असलेल्या नवी मुंबई शहरात कोरोना संसर्ग सुरू झाल्यानंतर आतापर्यंत 11,84,093 नागरिकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून 1,00734 जण करोनाबाधित आढळले आहेत. त्यानुसार 1 जुलै रोजी शहराचा एकूण लागणदर 8.35 टक्के इतका असून 1 जूनच्या तुलनेत त्यात एक टक्क्याची घसरण दिसून येते. असे असले तरी, जून महिन्यातील साप्ताहीक रुग्णसरासरीचा अंदाज घेतल्यास रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागल्याचे स्पष्ट होते. जूनच्या पहिल्या आठवड्यात सरासरी रुग्णसंख्या 98 इतकी होती. ती 10 जून रोजी 73 इतकी नोंदवली गेली. त्यानंतरच्या आठवड्यातही रुग्णसरासरी 76 इतकी कायम राहिली, मात्र 24 जून रोजीच्या आकडेवारीनुसार ही संख्या 91पर्यंत वाढली. एक जुलै रोजीच्या आकडेवारीनुसार साप्ताहीक रुग्णसरासरी 128वर पोहचली असून गेल्या दोन आठवड्यांपासून वाढू लागलेल्या रुग्णसंख्येमुळे ही वाढ दिसून येत आहे. दैनंदिन कोरोना रुग्णसंख्या आता दीडशेपर्यंत गेली आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यापासून नवी मुंबईत तिसर्या स्तरातील निर्बंध लागू करण्यात आले. रुग्णवाढ होत असल्याने दैनंदिन कोरोना चाचण्यांतही वाढ करण्यात आली होती. सरासरी दहा हजार चाचण्या करण्यात येत होत्या, मात्र मॉल बंद करण्यात आल्याने हे प्रमाण दिवसाला सहा ते सात हजारांपर्यंत चाचण्या करण्यात येत आहेत. सोमवारी 28 जूनपासून शहरात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यात मॉल, चित्रपट व नाट्यगृह बंद करण्यात आली असून दुकानांच्या वेळांतही बदल करण्यात आले आहेत. सोमवारी शहरात 12,164 कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. यात 160 रुग्ण आढळले होते. त्यानंतर 29 जून रोजी रुग्ण कमी होत 92पर्यंत खाली आले होते. गेली दोन दिवस सरासरी सात हजार कोरोना चाचण्या करण्यात येत असून 145 व 146 करोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे सोमवारपासून गेल्या पाच दिवसांत शहरांतील रुग्णवाढ स्थिर असल्याचे दिसत आहे.
कोरोना दैनंदिन स्थिती
तारीख नवे रुग्ण चाचण्या
26 जून 134 5201
27 जून 125 9704
28 जून 160 12164
29 जून 92 10237
30 जून 102 5840
1 जुलै 146 6708
2 जुलै 144 6985